ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिवरा धाबा परिसरात धुमाकूळ घालणारे अस्वल अखेर जेरबंद!

वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश ; शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ धाबा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या हिवरा धाबा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद केले आहे. धाबा गावाजवळील कोंढाणा शिवारात अस्वलाचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर अस्वलाला ताब्यात घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे

हिवरा धाबा परिसरातील शेतशिवारात मागील तीन दिवसांपासून अस्वलाचा वावर आढळून येत होता. सध्या शेतात धानपिकाची कामे सुरू असून, पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शेतशिवारात अस्वलाचा वावर असल्याने शेतकरी प्रचंड धास्तावले होते. रात्रीच्या वेळी शेतात जाताना वन्यप्राण्याच्या हल्ल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती.

अस्वलाच्या वावराची माहिती मिळताच धाबा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकर आणि त्यांचे पथक अस्वलाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अस्वलाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक प्रयत्न सुरू होते.

बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास वनविभागाने रेस्क्यू टीमला पाचारण केले. टँकनलीलायझर गनच्या साहाय्याने शार्प शूटर अविनाश फुलझेले यांनी अस्वलाला बेशुद्ध केले. त्यानंतर रेस्क्यू टीमने अस्वलाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत झाली आहे.

अस्वलाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असले, तरी जंगलालगतच्या शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे, वन्यप्राणी आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. वन्यप्राण्याच्या हालचाली आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे हिवरा धाबा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, वन्यप्राणी आणि मानवी वस्ती यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करण्याची गरज आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये