तहसीलदारांच्या वाहनातून विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन – तहसीलदार देवळी ह्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांच्या हस्ते विद्यार्थींना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
अविनाश नागदेवे, वर्धा
दिनांक 30 जून 2026 रोजी राज्य शासनाच्या शाळा सुरू झालेल्या असून देवळी तहसील अंतर्गत रत्नापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी देवळी तहसील चे तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी शासकीय वाहनातून विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत आणून प्रवेशोत्सवाला आगळावेगळा रंग दिला. तसेच इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला तहसीलदार समर्थ क्षीरसागर तसेच परिविक्षाधीन तहसीलदार नेमाजी देवणे, रत्नापूरचे सरपंच सुधीर बोबडे, उपसरपंच सौरभ कडू, ग्राम महसूल अधिकारी भाग्यश्री जाधव, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी आणि प्रत्येक बालक शाळेत दाखल व्हावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


