ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी; धनुर्विद्या अकादमी मंजुरीबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा : बल्लारपूर येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धनुर्विद्या अकादमीला मंजुरी मिळाल्याबद्दल भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. आदिवासी समाजातील युवकांमध्ये तिरंदाजीचे नैसर्गिक कौशल्य असून त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही अकादमी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्का आत्राम यांनी सांगितले की, १ ऑक्टोबर २०२४ रोजी पोंभूर्णा येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल C. P. Radhakrishnan यांना धनुर्विद्या अकादमी स्थापनेसंदर्भात निवेदन देण्यात आले होते. आदिवासी युवकांच्या अंगी असलेल्या तिरंदाजीच्या उपजत गुणांना योग्य दिशा आणि संधी मिळावी, हा त्यामागील उद्देश होता.

काही तांत्रिक कारणांमुळे पोंभूर्णा येथे अकादमी उभारणे शक्य झाले नसले, तरी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची धनुर्विद्या अकादमी मंजूर झाली. यामुळे आदिवासी युवक-युवतींसह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या अकादमीच्या माध्यमातून अनेक गुणवंत खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास अल्का आत्राम यांनी व्यक्त केला. त्यांनी यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आदिवासी समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचाही उल्लेख केला. आदिवासी विद्यार्थ्यांना माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यापासून ते शिक्षण, क्रीडा आणि कौशल्य विकासाच्या विविध उपक्रमांपर्यंत त्यांनी नेहमीच पुढाकार घेतल्याचे त्या म्हणाल्या.

“माझ्या निवेदनाची दखल घेत आदिवासी युवक-युवतींसाठी ही ऐतिहासिक आणि सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तमाम आदिवासी समाज, विद्यार्थी आणि खेळाडूंच्या वतीने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करते,” असे अल्का आत्राम यांनी म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये