गोंडपिपरीच्या सौंदर्यीकरणात भर टाकणार १ कोटींचे “नमो उद्यान”
व्यंकटपूर मार्गावर जागेची निवड, निविदा प्रक्रिया पूर्ण ; आमदार देवराव भोंगळेच्या पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी शहरात “नमो उद्यान” साकारले जात असून यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. १ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या उद्यानामुळे विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शासनस्तरावरून या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. नमो उद्यान प्रकल्पाकरिता निश्चित करण्यात आलेल्या जागेचा कोणताही वाद नसल्यामुळे विकासात्मक कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोंडपिपरी नगर पंचायत मार्फत नमो उद्यान प्रकल्पाकरिता शहरातील व्यंकटपूर रोडवरील सर्वे क्रमांक २५१, २५२ आणि २५३ या खुल्या जागेची निवड करण्यात आली असून या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले उद्यान विकसित केले जाणार आहे. प्रकल्पाकरिता आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण निविदा प्रक्रिया गोंडपिपरी नगर पंचायतकडून राबविण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र कंत्राटदारांच्या नियुक्तीने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या, बालगोपालांसाठी खेळण्याची अपुरी व्यवस्था, युवावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याच्या जागेची गरज लक्षात घेऊन मागील अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीला प्रकल्पाच्या मंजुरी अखेर यश प्राप्त झाले आहे. ज्यामुळे आबालवृद्धांपासून तर युवावर्गांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोंडपिपरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांनी सतत पाठपुरावा केला. गोंडपिपरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, प्रभागाचे नगरसेवक अनिल झाडे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक राकेश पूण यांच्यासमवेत सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे शहराला ही मोठी भेट प्राप्त झाली आहे.
गोंडपिपरी शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा घटक ठरणार असून बालक, युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाचा हा उपक्रम निश्चितच आनंददायी ठरणार आहे. प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होताच कामाला सुरुवात होणार असल्यामुळे शहरवासीयांचे लक्ष आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागले आहे.
*नमो उद्यानातील सुविधा*
प्रस्तावित असलेल्या नमो उद्यानात बालकांसाठी आकर्षक व देखणी खेळणी, युवांसाठी व्यायामशाळा व फिटनेस सुविधा, महिलांसाठी सुरक्षित, सुंदर व मनमोहक परिसर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी बैठक आसन, सुशोभित पायवाटा, निसर्गरम्य वृक्षारोपण आणि अत्याधुनिक प्रकाशयोजना यांचा समावेश असणार आहे. यामुळे हे उद्यान शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच नागरिकांसाठी आरोग्यदायी, आनंददायी आणि विरंगुळ्याचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे.
*स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद*
शहरातील आपल्या प्रभागात नागरिकांसाठी एक चांगला बगीचा तयार व्हावा आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी, ही माझी मनस्वी इच्छा होती. मी बघितलेले स्वप्न “नमो उद्यान” च्या रूपाने पूर्ण होत असल्याचा आनंद होत असल्याची भावना प्रभागाचे नगरसेवक अनिल झाडे यांनी व्यक्त केली.



