आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घुग्घुस येथे सामूहिक योगाभ्यास व योग शिबिर उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
घुग्घुस :_ आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता प्रयास सभागृह, घुग्घुस येथे सामूहिक योगाभ्यास व योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पतंजली योग समितीचे अध्यक्ष तथा योग शिक्षक अनिल नित यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास कशी मदत होते, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपाचे चंद्रपूर जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. निरोगी, तणावमुक्त आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविले पाहिजे.”
या कार्यक्रमास मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष व सदस्य, महिला पतंजली योग समितीच्या पदाधिकारी व सदस्य तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पतंजली योग समिती, प्रयास सखी मंच आणि सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.



