ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या १४ मागण्यांसाठी शिवसेना (उबाठा) रस्त्यावर; देऊळगाव राजात धरणे आंदोलन

 ‘शेतकरी मेटाकुटीला, सरकार झोपेत’; कर्जमाफीपासून पाणीपुरवठ्यापर्यंत विविध प्रश्नांवर एल्गार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : केंद्र व राज्य सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देऊळगाव राजा येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका प्रमुख दादाराव खार्डे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शेकडो शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते.

बसस्थानक चौक परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर तहसीलदारांना १४ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात कोणत्याही अटी व शर्तींशिवाय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे, २४ जून २०२५ पूर्वीची प्रधानमंत्री पीक विमा योजना कार्यान्वित करून लाभ देणे, एजी फिडरवरील सिंगल फेज वीजपुरवठा २४ तास सुरू ठेवणे, जुन्या एमआरपीची रासायनिक खते प्रथम विक्रीस उपलब्ध करणे आणि लिंकिंग विक्री थांबविणे अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय पेरणी लांबल्यामुळे कमी कालावधीच्या पिकांच्या वाणांची उपलब्धता करून देणे, जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करणे, देऊळगाव राजा शहराला नियमित दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे, तालुक्यातील जोडरस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करणे, मनरेगा अंतर्गत विहिरींचे रखडलेले अनुदान अदा करणे, प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजनेचे थकीत हप्ते वितरित करणे, पात्र लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रेशन सुरू करणे, तसेच गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करणे अशा विविध मागण्याही करण्यात आल्या.

महाडीबीटी अंतर्गत निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांना पूर्वसंमती व थकीत अनुदान तात्काळ देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी दादाराव खार्डे, गोविंदराव झोरे, वसंतराव खुळे, गिरीश वाघमारे, संभाजी शिंगणे, शांताबाई सानप, निलेश देशमुख, अजय शिवरकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तालुका प्रमुख दादाराव खार्डे म्हणाले, “शेतकरी आज निसर्गाचा कोप, वाढती महागाई आणि शासनाच्या उदासीनतेमुळे मेटाकुटीला आला आहे. कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहेत. आमच्या मागण्या रास्त असून शासनाने तातडीने त्यावर निर्णय घ्यावा. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये