नगराध्यक्ष अरुण धोटे यांची जनआरोग्य समिती सदस्यपदी नियुक्ती
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या वतीने नियुक्ती _ सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनात राजुराचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, सक्षम व प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत स्थानिक लोकप्रतिनिधींना आरोग्य व्यवस्थापन प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या वतीने राजुरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अरुण रामचंद्र धोटे यांची राज्यस्तरीय जनआरोग्य समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंत्रालय मुंबई येथून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्यात येत असून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील जनआरोग्य समिती तसेच रुग्णालयांमधील रुग्ण कल्याण समिती यांच्या कार्यात लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
या समित्यांमार्फत आरोग्य, स्वच्छता, पोषण, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि लोककेंद्रित होण्यास मदत होणार आहे.
नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नियुक्तीमुळे राजुरा शहराच्या आरोग्यविषयक समस्या व गरजा शासनापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि स्थानिक प्रश्नांवरील अभ्यासाचा लाभ समितीच्या कामकाजात होणार असून नागरिकांच्या आरोग्यविषयक हितासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
राजुरा शहरासह परिसरातील नागरिकांनी या नियुक्तीचे स्वागत केले असून, आरोग्य सुविधा अधिक सक्षम व जनहिताभिमुख करण्यासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



