शेतातील गोठ्याला भीषण आग : चार लाखांचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ तालुक्यातील वायगाव येथील शेतकरी वसंता काकडे यांच्या शेतातील गोठ्याला शुक्रवारी सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजताच्या दरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत शेतीसाठी वापरण्यात येणारे खत, सिंचनासाठीचे पाईप तसेच विविध शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरल्याने गोठ्यात साठवून ठेवलेल्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
या आगीत शेतकऱ्याच्या शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्य जळाल्याने वसंता काकडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित महसूल विभागाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित विभागाकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे वायगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शेतकरी कुटुंबावर आलेल्या संकटाबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे.



