कार्ला चौक परिसरातून ३० हजार रुपयांची विदेशी दारू जप्त, एकावर गुन्हा दाखल
रामनगर पोलिसांची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
जिल्ह्यात अवैध दारू विक्री विरोधात राबविल्या जात असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनच्या दारूबंदी पथकाने शनिवारी (दि. १३ जून) रात्री कार्ला चौक परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ३०,१०० रुपये किमतीचा विविध नामांकित कंपन्यांचा विदेशी दारू आणि बिअरचा साठा जप्त केला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुप्त माहितीवरून टाकली धाड
मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकाला कार्ला चौकातील आकरे सभागृहाच्या मागे अवैध दारूचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दि. १३/०६/२०२६ रोजी रात्री ७:३० ते ८:०० वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी ‘कोम्बिंग मोहीम’ राबवून अचानक छापा (रेड) टाकला.
या छाप्यात पोलिसांना वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांचा दारू व बिअरचा साठा मिळून आला. पोलिसांनी एकूण ३०,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी संगम सूरज साहू (वय २९ वर्षे, रा. आकरे सभागृहामागे, कार्ला चौक, वर्धा) याला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ५६८/२६, कलम ६५(ई) आणि ७७(अ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत (म.दा.का.) गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
कारवाई करणारे पथक
सदर यशस्वी कारवाई रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक (पो.नि.) राखोंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात व निर्देशानुसार, दारूबंदी पथकाचे पोलीस अंमलदार पो.हवा. अवि बनसोड, मुकेश वांदिले, मनोज भोमले आणि विक्की अनेराव यांनी केली आहे.



