आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
युवा नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावती येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळवाटप करून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुकाप्रमुख नरेश काळे, तालुका संघटक सचिन डुकरे, शहरप्रमुख अश्विन हेमके आणि महिला जिल्हा संघटक भावना खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी रुग्णांची आस्थेवाईक चौकशी करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त करत फळांचे वाटप करण्यात आले. तसेच रुग्णांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना धीर देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढदिवस हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून समाजसेवेची प्रेरणा देणारा दिवस ठरावा, अशी भावना व्यक्त केली. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतानाच त्यांच्या प्रेरणेने भविष्यातही समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



