गरजूंच्या दारी जाऊन योजनांचे सत्यापन
रूपचंद लाटेलवार यांची लोकाभिमुख सेवा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी सावली येथील रूपचंद लाटेलवार यांनी घेतलेला पुढाकार सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच पीएम किसान योजनेच्या ई-केवायसी व सत्यापन प्रक्रियेसाठी त्यांनी अंध, अपंग, वृद्ध आणि आजारी नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष मदत केली.
अनेक लाभार्थ्यांना कार्यालयात येणे शक्य नसल्याने त्यांची गैरसोय लक्षात घेऊन रूपचंद लाटेलवार यांनी स्वतः त्यांच्या दारापर्यंत पोहोचून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व प्रक्रिया पूर्ण केली. ३० जूनपर्यंत मुदत असलेल्या या कामामुळे अनेक गरजू नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांच्या कुटुंबांचा आधार कायम राहण्यास मदत झाली आहे.
समाजहिताची जाणीव ठेवून केलेल्या या कार्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. केवळ शासकीय कामकाज न समजता समाजसेवेच्या भावनेतून केलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.
रूपचंद लाटेलवार यांच्या या लोकाभिमुख कार्याबद्दल नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील समाजसेवेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
“संवाद कौशल्य कामातील पारदर्शकता आणि समाज हिताची तळमळ यामुळे त्यांनी जनतेच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले.” आपल्या कार्यातून सतत समाजविकासाच ध्यास घेणारे ते एक आदर्श व आश्वासक व्यक्तिमत्व आहेत .”
*दिवाकर गेडाम, माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचे सहाय्यक
“रूपचंद लाटेलवार यांची संवेदनशीलता, तत्परता आणि लोकसेवेची भावना अनुकरणीय आहे. अशा कार्यामुळेच शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचतात.”
खुशाल लोडे, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था*



