ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहिणाबाई विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- येथील बहिणाबाई विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्याचा प्रेरणादायी परिचय करून देण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक सतीश राठोड हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगम विद्यालय वणी येथील दशरथ कुंटेवाड यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना अण्णाभाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, साहित्यिक योगदान, सामाजिक समतेसाठी केलेले कार्य आणि शिक्षणाचे महत्त्व यावर प्रभावी विवेचन केले. त्यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संतोष निखाडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांतून सामाजिक बांधिलकी, परिश्रम आणि स्वाभिमानाची प्रेरणा घेण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित मनोगते सादर करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष इंद्राळे यांनी केले. सूत्रसंचालन संघरक्षित तावाडे यांनी प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा समजून घेण्याची संधी मिळाली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि उपस्थितांनी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचा संकल्प व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये