१५ लाख ३० हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपीस तेलंगणातून अटक
लाठी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील तेलंगणा सीमेवर वसलेल्या सोनापूर देशपांडे येथील एका किराणा दुकानाचे दार तोडून दुकानातील १५ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करून तेलंगणात पळून गेलेल्या आरोपीला अवघ्या २४ तासात मुद्देमालासह लाठी पोलिसांनी अटक केली आहे.
सोनापूर देशपांडे येथील समीर अरुण बोमकंटीवार यांचे किराणा दुकानाचे रात्रीच्या वेळेत दार तोडून दुकानात प्रवेश केला व दुकानातील ड्रॉव्हरमधील ३० हजार आणि कापडी पिशवीतील १५ लाख असे एकूण १५ लाख ३० हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार लाठी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांनी घटना गाठून निरीक्षण केले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी आशिष जानकीराम चौधरी हा चोरी करतांना स्पष्टपणे दिसून आले.
चोरीचा गुन्हा उघडकीस येताच तात्काळ तपासचक्रे फिरवून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली. एक पथक तेलंगणा राज्यात तर दुसरे पथक गडचिरोली जिल्ह्यात रवाना करण्यात आले. तपासादरम्यान आरोपीचे हालचालीबाबत तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी तेलंगणा राज्यात असल्याची खात्री झाली.
लाठी पोलीस पथकाच्या मदतीला चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखा आणि लाठी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत आरोपी आशिष जानकीराम चौधरी याला तेलंगणा राज्यातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांनी आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात लाठी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार आणि त्यांचे पोलिस कर्मचारी, तसेच चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखा कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केली आहे.



