ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात 15 जूनपासून श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे सर्वेक्षण

जिल्ह्यात प्रथमच होणार सर्वेक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी राज्यात प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या सर्वेक्षणाला 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. या सर्वेक्षणात माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरावरील आर्थिक व सामाजिक निर्देशकांची अचूक माहिती उपलब्ध करून विकास नियोजन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्याचा विकास हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू मानला जात असल्याने प्रत्येक जिल्ह्याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणातून रोजगार, श्रमशक्ती, असंघटित क्षेत्रातील उद्योग, उत्पन्न तसेच विविध सामाजिक-आर्थिक घटकांची माहिती संकलित केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे राज्य व जिल्हास्तरावरील विकास आराखडे, धोरणे आणि कल्याणकारी योजनांची आखणी अधिक अचूकपणे करता येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

राज्यभरात या उपक्रमांतर्गत एकूण 6 हजार 828 नमुना घटकांचा समावेश करण्यात आला असून 276 अन्वेषक व निरीक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. सर्वेक्षणातून मिळणारी आकडेवारी ग्रामपातळीपासून जिल्हा आणि विभागीय स्तरावरील विकास नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

सर्वेक्षणाचे क्षेत्रीय कामकाज आयपीएसओएस रिसर्च प्रा. लि., मुंबई यांच्यामार्फत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. नागरिकांनी सर्वेक्षण पथकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त मुरलीनाथ वाडेकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये