ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळीत शनिवारी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा जनसंवाद

नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तत्काळ निराकरणावर भर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा विशेष जनसंवाद कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जून रोजी दुपारी 3 वाजता देवळी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ.भोयर नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि विविध विकासकामांबाबतच्या सूचना जाणून घेणार आहेत.

जनतेशी थेट संपर्क ठेवण्याची आणि प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनविण्याची भूमिका सातत्याने मांडणारे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी जनता दरबार आणि जनसंवादाची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जनसंवाद कार्यक्रमाला आ.राजेश बकाणे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांकडून तत्काळ चर्चा होऊन आवश्यक त्या उपाययोजनांना गती मिळणार आहे.

कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री डॉ.भोयर विविध विभागांशी संबंधित तक्रारी, विकासकामांतील अडथळे, महसूल, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, कृषी तसेच इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेतील. प्राप्त तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देशही देण्यात येणार आहेत.

नागरिकांना आपले प्रश्न आणि अडचणी व्यवस्थितपणे मांडता याव्यात यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक नागरिकांची समस्या, अडचण जाणून घेतल्या जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने हा जनसंवाद कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाने वर्धा व देवळी तालुका तसेच परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन काले आहे. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या उपस्थितीत होणारा हा जनसंवाद नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणारा ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये