पोंभूर्णा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- पोंभूर्णा तालुक्यात सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या संबंधित आदेशानुसार आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या २५ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १० (२) मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीतील सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी आरक्षण चक्रानुक्रम पद्धतीनुसार संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रभागांची सोडत काढण्यात येणार असून त्यासाठी निश्चित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सुधारित आदेशानुसार तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दि.१० जुन ला मोहाळा (रै.),चेक ठाणेवासना,पिपरी देशपांडे,चक ठाणा, जामखुर्द,जुनगाव,दिघोरी,नवेगाव मोरे,भिमणी,आष्टा,केमारा, कसरगट्टा,चक फुटाणा,फुटाणा मोकासा,थेरगाव (रै.),चक आंबेधानोरा,सातारा भोसले,चक हत्तीबोळी,देवाडा खुर्द. दि.११ जुनला घोसरी,घनोटी तुकूम,उमरी पोतदार,देवाडा (बुज),घाटकुळ,चेक आष्टा,वेळवा माल. दि.१२ जुनला जामतुकूम,चिंतलधाबा,चक बल्लारपूर या ग्रामपंचायत कार्यालयात निर्धारित दिनांकाला सोडत काढून आरक्षण जाहीर केले जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि ग्रामस्थांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. निवडणूक प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून आरक्षण निश्चितीनंतर उमेदवारीच्या हालचालींना अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.



