वडिलांच्या स्मृतीत मुलीचा वाढदिवस
मित्रांनी दु:खाचे क्षण आनंदात रुजविले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कोरोना काळात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. भद्रनाग वॉर्ड येथील कबड्डीपटू स्वर्गीय सुनिल सुधाकर तोडासे (बबलू) यांचे कोरोनामुळे निधन झाले. विशेष म्हणजे, ज्या दिवशी त्यांचे निधन झाले त्याच दिवशी त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. एकीकडे वडिलांचा मृत्यू आणि दुसरीकडे मुलीचा जन्म झाल्याने तोडासे कुटुंबियांवर भावनिक आघात झाला होता.
सुनिल तोडासे यांचे वडील यापूर्वीच निधन पावले होते. कुटुंबाचा आधार असलेला एकमेव कमावता मुलगा कोरोनाने हिरावून नेल्याने आई व पत्नीवर मोठे संकट ओढवले. सध्या त्यांची आई आणि पत्नी शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. सुनिल यांच्या निधनानंतर जन्मलेल्या मुलीचे नाव बबली असे ठेवण्यात आले.
वडिलांच्या निधनाचा दिवस आणि मुलीचा जन्मदिवस एकच असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला नव्हता. मात्र यंदा सुनिल यांच्या मित्रांनी पुढाकार घेत झालेले दु:ख विसरून मुलीचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले.
बुधवारी बबलीचा पाचवा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे ३५० नागरिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थितांनी बबलीला शुभेच्छा देत तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोलू गेडाम, निलकंठ तराळे, किशोर खांदारे, संदीप गोखरे, सचिन चौरे, मोनू पारधे, वसीम सय्यद, गौरव चिंचोलकर, सागर भेले, मेजर ठमके, कार्तिक बावनकर, निरंजन आत्राम, महादेव सिडाम, पिंटू मडावी यांनी पुढाकार घेत सहकार्य केले. “आमचा मित्र आज हयात नसला तरी तुमच्या पाठीशी आम्ही कायम उभे राहू,” असा विश्वास मित्रांनी यावेळी तोडासे कुटूंबियांना दिला. मित्रांच्या या उपक्रमामुळे लहानग्या बबलीच्या चेहऱ्यावरही काही क्षणांसाठी हसू फुलले.



