“पाचव्या दिवशी अर्धनग्न आंदोलन; रोजगाराच्या मागणीसाठी संघर्ष तीव्र”
"उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; प्रशासनाचे मौन”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर :_ स्थानिक बेरोजगार युवक, कंत्राटी कामगार, प्रकल्पग्रस्त व विस्थापितांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी रोशन हरबडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी दररोज वेगवेगळ्या स्वरूपात निषेध नोंदविला आहे. २ जून रोजी मुंडन आंदोलन, ३ जून रोजी WCL चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारून निषेध, तर ४ जून रोजी तोंडाला काळे फासून आंदोलन करण्यात आले होते. मात्र, या सर्व आंदोलनांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य, कंत्राटी भरती प्रक्रियेत पारदर्शकता, श्रम कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, प्रकल्पग्रस्त व विस्थापितांना न्याय तसेच स्थानिक युवकांवरील अन्याय थांबविण्याच्या मागण्या वारंवार मांडूनही WCL प्रशासन उदासीन असल्याचा आरोप रोशन हरबडे यांनी केला. त्यामुळे परिसरातील बेरोजगार युवकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपोषणकर्ते रोशन हरबडे व नंथू नवले यांची प्रकृती खालावत चालली असून त्यांनी वैद्यकीय तपासणी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, उपोषणकर्त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत असतानाही प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नाही.
दरम्यान, माजी आमदार सुभाष धोटे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
प्रशासन आणि WCL व्यवस्थापनाने तात्काळ चर्चेचा मार्ग स्वीकारून मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास उपोषणकर्ते पाणीही बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासनाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.



