शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, पालकांचा शाळा बंदचा इशारा
विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा घेतला "लाठी" गावकऱ्यांनी निर्णय : प्रतिनियुक्तीवरील शिक्षिकेला मूळ शाळेत परत पाठविण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाठी येथील शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत पालक व ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षिकेला तात्काळ मूळ शाळेत परत पाठविण्याची मागणी (दि.२०) सोमवारी केली आहे.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात शाळेची विद्यार्थी संख्या ९५ असून शासनाच्या निकषानुसार शाळेत तीन पदवीधर शिक्षक, एक भाषा विषय शिक्षक व एक विज्ञान विषय शिक्षक अशी पदे मंजूर आहेत.मात्र सध्या शाळेत केवळ चार शिक्षक कार्यरत आहेत.त्यापैकी सहाय्यक शिक्षिका सिंधू समीर मत्ते यांची ३० एप्रिल पासून दुसऱ्या शाळेत प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय एका शिक्षकावर बीएलओची जबाबदारी असल्याने उर्वरित शिक्षकांवर सर्व वर्गांचा अतिरिक्त ताण पडत आहे.परिणामी विद्यार्थ्यांना अपेक्षित दर्जाचे शिक्षण देणे कठीण होत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिनियुक्तीवरील शिक्षिकेला तात्काळ लाठी येथील मूळ पदस्थापनेवर परत नियुक्त करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.
मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामस्थ व पालकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून मंगळवारपासून शाळेत विद्यार्थ्यांना न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. यावेळी शा.व्य.स अध्यक्ष किशोर मेंगरे,उपाध्यक्ष दिपाली सातपुते, रत्नाकर पाल,शीतल खेकारे,वैशाली शेरके,गजानन चौधरी,मारोती गेडाम, नितीन गेडाम,सुनील चावरे,मारोती बावणे,प्रभाकर बावणे,मनोहर गेडाम, बंडू चावरे यांच्यासह गावातील शेकडो पालकांची उपस्थिती होती.



