बँक ऑफ इंडियाच्या गोंडपिपरी शाखेत ‘किसान दिन’ उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- बँक ऑफ इंडिया, गोंडपिपरी शाखेच्या वतीने दि.२० सोमवारी ‘किसान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. शेती क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाचा गौरव करत बँकेने शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी वरिष्ठ शाखा प्रबंधक अजय दुर्गे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली. पीक कर्ज, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर, डिजिटल बँकिंग सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेती व्यवसाय अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाला चंद्रपूर आरबीसी प्रमुख निशा परमार, विपणन अधिकारी मयूर गजभिये, अधिकारी कुश गौरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.याशिवाय परिसरातील अनेक शेतकरी, बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शेतकरी व बँक अधिकाऱ्यांमध्ये संवाद साधण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी, पीक कर्ज प्रक्रिया आणि कृषी वित्तपुरवठ्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये बँकेच्या कृषी योजनांविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांना आधुनिक शेतीसाठी आर्थिक बळ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



