ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभूर्णा तालुक्यातील फुटाणा मोकासा येथील वादळग्रस्तांना तातडीने मदत द्या; मृत व्यक्तीच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य द्या

आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट

अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई देण्याची आ.मुनगंटीवार यांची मागणी

चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभूर्णा तालुक्यातील फुटाणा मोकासा येथे अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची गंभीर दखल घेत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. वादळामुळे घरांचे, शेतीचे आणि वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांवर संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त नागरिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, कोसळलेले वीज खांब उभारून वीजपुरवठा पूर्ववत करावा तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या स्व. लहानूबाई नानुजी पाल यांच्या कुटुंबाला विशेष आर्थिक सहाय्य व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

यासोबतच आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनाही पत्र पाठवून पोंभूर्णा तालुक्यातील फुटाणा मोकासा येथे अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी,अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांच्याकडं केली आहे.

आ. मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, पोंभूर्णा तालुक्यातील फुटाणा मोकासा गावात २८ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही घरे अंशतः तर काही घरे पूर्णपणे पडली असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मदतकार्य सुरू करावे, अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली आहे.

या नैसर्गिक आपत्तीत स्व. लहानूबाई नानुजी पाल यांच्या घरावरील टीनाचे शेड कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.तसेच चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे व अन्य मालमत्तेचे त्वरित पंचनामे करून शासनाच्या निकषानुसार मदत वितरित करावी, कोसळलेले वीज खांब उभारून वीजपुरवठा पूर्ववत करावा आणि सर्व प्रभावित नागरिकांना शक्य ती मदत तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्याची विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नैसर्गिक संकटाच्या या काळात शासनाने संवेदनशील भूमिका घेत प्रभावित कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला युद्धपातळीवर मदतकार्य राबविण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये