स्व. बाळूभाऊ धानोरकरांनी चंद्रपुरात काँग्रेसला दिली नवी दिशा : काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला ३ रा पुण्यस्मरण सोहळा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : “दिवंगत माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर हे केवळ एक लोकप्रतिनिधी नव्हते, तर ते लाखो कार्यकर्त्यांचे हक्काचे कवच आणि ऊर्जेचा महास्त्रोत होते. आपल्या झंझावाती कार्यकाळात त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मरगळ झटकून एक नवी दिशा आणि अभूतपूर्व गती दिली. बाळूभाऊंनी जनमानसावर उमटवलेला हा ठसा आणि त्यांचे विचार आपण कधीही विसरू शकत नाही,” असे अत्यंत भावूक उद्गार काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
दिवंगत माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या ३ ऱ्या पुण्यस्मरणार्थ आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी बाळूभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी आमदार सुभाष धोटे यांनी बाळूभाऊंसोबत घालवलेले अनेक प्रसंग, राजकीय संघर्ष आणि आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले की, “बाळूभाऊंच्या कार्यकाळात जिल्ह्यात पक्ष संघटन अत्यंत आक्रमक आणि मजबूत झाले होते. त्यांनी निर्माण केलेली ऊर्जेची लाट कार्यकर्त्यांमध्ये आजही कायम आहे. राजकीय जीवनात जनसामान्यांशी कशी नाळ जोडायची, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळूभाऊ होते. त्यांच्या या आठवणी आणि विचार कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी नेहमीच प्रेरणा देत राहतील.”
या पुण्यस्मरण सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बाळूभाऊंच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.



