ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फुटाणा मोकासा येथील वादळग्रस्तांना तातडीने मदत द्या; मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य द्या : आ. सुधीर मुनगंटीवार

मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी; नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून त्वरित भरपाई देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील फुटाणा मोकासा येथे अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची गंभीर दखल घेत आमदार Sudhir Mungantiwar यांनी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. वादळामुळे घरांचे, शेतीचे तसेच वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून प्रभावित नागरिकांना त्वरित मदत मिळावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

आ. मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात नुकसानग्रस्त घरांचे व शेतीचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत वितरित करावी, कोसळलेले वीज खांब उभारून वीजपुरवठा पूर्ववत करावा तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या स्व. लहानूबाई नानुजी पाल यांच्या कुटुंबाला विशेष आर्थिक सहाय्य व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

याशिवाय त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनाही स्वतंत्र पत्र पाठवून प्रशासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर काम करून नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत व मदत वितरणाची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी केली आहे.

२८ मे रोजी फुटाणा मोकासा गावात झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे अनेक घरांचे अंशतः व पूर्णतः नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मदतकार्य सुरू करावे, असे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीत स्व. लहानूबाई नानुजी पाल यांच्या घरावरील टिनाचे शेड कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

नैसर्गिक संकटाच्या या काळात शासनाने संवेदनशील भूमिका घेत प्रभावित कुटुंबांना दिलासा द्यावा आणि संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर मदतकार्य राबवावे, असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये