शेतकरी परिषदेत आ. विजय वडेट्टीवारांची गर्जना…
शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या सरकारचा डाव हाणून पाडा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी MIDC प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार महामोर्चा
तालुक्यातील १२ गावांतील सुपीक शेती उद्योग प्रकल्पांच्या नावाखाली ताब्यात घेण्याच्या हालचालींविरोधात शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला असून, या संघर्षाला काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या वतीने आयोजित भव्य परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधत, “शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यांना भूमिहीन करणाऱ्या सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही,” असा इशारा दिला. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेमुळे गोंडपिपरीतील आंदोलनाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गोंडपिपरी तालुक्यात काही महिन्यांपूर्वी १२ गावांतील शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता, घेतलेल्या या निर्णयामुळे परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. “एकीकडे शेतकरी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक संकटांनी त्रस्त आहे, तर दुसरीकडे सरकार उद्योगपतींसाठी त्यांची जमीन हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा विकास नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरचा घाला आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची सुपीक जमीन हिरावून घेण्याचा प्रकार सहन केला जाणार नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा दिल्यास कोणतीही शक्ती त्यांची जमीन बळकावू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ॲड. दिपक चटप यांनी कोणतीही नोटीस आल्यास घाबरून न जाता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. ॲड. बोधी रामटेके यांनीही सरकारच्या भूमिकेचा निषेध करत शेतकऱ्यांच्या लढ्याला कायदेशीर आणि संघटनात्मक बळ देण्याची ग्वाही दिली.
परिषदेच्या अखेरीस शेतकरी, ग्रामस्थ आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. या आंदोलनामुळे गोंडपिपरी तालुक्यातील जमीन अधिग्रहणाचा मुद्दा आता अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत असून, शेतकऱ्यांचा लढा आगामी काळात आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या आंदोलनात एमआयडीसी प्रकल्पातील बारा गावातील हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शालिक माऊलीकर, मोरेश्वर सुरकर, सुरज माडुरवार, कमलेश निमगडे, सचिन फुलझेले, राजू झाडे, संजय माडुरवार, राजेश कवठे, अमावस्या निमसरकार अनेकांनी आंदोलनासाठी अथक परिश्रम घेतले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आंदोलन पार पडले.
*आ. देवराव भोंगळेंना “त्या” बारा गावात गावबंदीचा ठराव मंजूर*
शेतकरी परिषदेदरम्यान एका वृद्ध महिलेने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपली व्यथा मांडत सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. त्या क्षणी संपूर्ण सभास्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित असलेल्या हजारो शेतकऱ्यांनी स्थानिक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत एमआयडीसी प्रकल्पातील बारा गावामध्ये गावबंदीचा ठराव मंजूर केला.



