जिवती तालुक्यात अवैध दारू विक्रीचा जोर
पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती : जिवती तालुक्यात अवैध देशी-विदेशी दारू विक्री दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये खुलेआम हातभट्टी दारू, देशी मद्य आणि विदेशी ब्रँड्सची विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे युवक, महिलांसह संपूर्ण कुटुंबांवर व्यसनाचा विपरीत परिणाम होत असून, सामाजिक आणि कौटुंबिक विघटन वाढले आहे.
जिवती शहर, शेणगाव, पाटागुडा, कुंभेझरी, वणी व आसपासच्या गावांत ठराविक ठिकाणी नियमितपणे अवैध दारू उपलब्ध होत आहे.दारू दुकान नसलेल्या भागातही तस्करांकडून पुरवठा केला जातो.रात्रीच्या वेळी वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात दारू आणली जाते आणि गल्लीबोळात विक्री केली जाते.यामुळे गुन्हेगारी वाढण्यासोबतच युवा पिढी बरबाद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
•ठाणेदार प्रवीण जाधव यांच्या कारकिर्दीत आशा फोल
यापूर्वी जिवती पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण जाधव यांनी अवैध दारू विक्रीविरोधात कठोर भूमिका घेत गावागावात आणि शाळांमध्ये जनजागृती मोहीम राबवली होती. यामुळे स्थानिक नागरिकांनी मोठ्या आशा बाळगल्या होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांत परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. सध्या दिवसाढवळ्या देशी दारूच्या पेट्या दुचाकीने उघड्यावर नेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.
•तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून ‘ताडी’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दारू मध्यविक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. या ताडीमध्ये विविध केमिकल्स मिसळून विक्री केली जाते. अनेक तरुण ‘दारू पीत नाही’ म्हणून ताडी पितात, परंतु त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत. रात्रीच्या वेळी वादविवाद, मारामारीचे प्रमाण वाढले आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, अवैध विक्रेते आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये अर्थपूर्ण संबंध असल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अनेकदा तक्रार दाखल केली जाते, मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही. उलट विक्रेते अधिक निर्भय झाल्याचे चित्र आहे.जिवती तालुक्यातील ही वाढती अवैध दारू विक्री केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न न राहता, तरुण पिढी आणि कुटुंबव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण करणारी समस्या बनली आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी,अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे



