ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणुसकीची साखळी! वर्धेत ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा; हरवलेला मोबाईल मूळ मालकाला परत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पत्रकार बंधूंच्या बातमीचा मोठा प्रभावः दोन दिवसांत ५ नागरिकांनी सायबर पोलिसांकडे जमा केले सापडलेले मोबाईल!

समाजात माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती वर्धा शहरात पुन्हा एकदा आली आहे. काही दिवसांपूर्वीच सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने एक हरवलेला मोबाईल मूळ मालकापर्यंत पोहोचवण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एका ऑटो चालकाच्या प्रामाणिकतेमुळे एका नागरिकाला त्याचा मौल्यवान मोबाईल सुखरूप परत मिळाला आहे.

वर्धा येथील रहिवासी चंद्रशेखर बासुदेव भागवत वय ८० वर्ष (रा. केरकळ वाडी, वर्धा) हे ऑटोने प्रवास करत असताना त्यांचा मोबाईल ऑटोमध्येच गहाळ झाला होता. संबंधित ऑटो चालक श्री. सुलतान शेख करीम शेख (रा. आर्वी नाका, वर्धा) यांना त्यांच्या गाडीत हा मोबाईल पडलेला दिसून आला. कोणताही मोह न बाळगता, आपली सामाजिक जबाबदारी ओळखून श्री. सुलतान शेख यांनी त्वरित सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे गाठून सदर मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला.

याबाचत तात्काळ दखल घेत सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. अनिल मेश्राम आणि पोलीस हवालदार श्री. दिनेश बोधकर यांनी तत्परतेने मोबाईल मालक श्री. चंद्रशेखर भागवत यांचा शोध घेऊन त्यांना सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक श्री. मेश्राम यांच्या हस्ते आणि प्रामाणिक ऑटो चालक श्री. सुलतान शेख यांच्या उपस्थितीत हा मोबाईल मूळ मालकाला सुपूर्व करण्यात आला. आपला मोबाईल सुरक्षित परत मिळाल्याने श्री. भागवत यांनी पोलीस प्रशासन आणि ऑटो चालकाचे मनःपूर्वक आभार मानले.

वर्धा पोलिसांनी या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंचे विशेष अभिनंदन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, “काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी अशाच एका प्रामाणिकपणाच्या घटनेची दखल घेऊन वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीचा समाजावर एवढा सकारात्मक प्रभाव पडला की, अवघ्या २ दिवसांत ५ वेगवेगळ्या नागरिकांनी त्यांना सापडलेले मोबाईल स्वतःहून सायबर पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केले आहेत. हे सर्व मोबाईल सायबर पोलिसांतर्फे त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले आहेत.”

वर्धा शहरात पडत असलेल्या या सलगच्या घटनांमुळे समाजात आजही प्रामाणिकपणा आणि माणुसकीची साखळी भक्कम असल्याचे दिसून येत आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल ऑटो चालक आणि सायबर पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये