आसोलामेंढा नहराचे पाणी शेतीसाठी तातडीने सोडावे
शिवसेना तालुका प्रमुख उमेश गोलेपल्लीवार यांची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील आसोला मेंढा परिसरातील शेतकरी सध्या पाण्याअभावी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. खरीप हंगाम सुरू असून पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आसोला मेंढा नहराचे पाणी तात्काळ शेतीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख उमेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.
उमेश गोलेपल्लीवार यांनी सांगितले की, परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली आहे. मात्र पुरेशा पाण्याअभावी पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नहराचे पाणी तातडीने सोडल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि पिकांचे नुकसान टाळता येईल.
तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कोणताही विलंब न करता आसोला मेंढा नहराचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही उमेश गोलेपल्लीवार यांनी दिला आहे.



