प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलैपर्यंत सहभागी व्हावे
खरीप हंगाम 2026 साठी पीक विमा नोंदणीला सुरुवात तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अशोक डोईफोडे
कोरपना :_ प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 साठी लागू करण्यात आली असून, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत पीक विमा नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, गोविंद ठाकूर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात खरीप हंगाम 2016 पासून राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खरीप 2026 व रब्बी 2026-27 या एक वर्षाच्या कालावधीसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना Cup & Cap Model (80:110) नुसार राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करिता योजनेची अंमलबजावणी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे आवश्यक आहे.
पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी डिजिटल पीक सर्वेक्षण (Digital Crop Survey – DCS) अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील.
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर क्षेत्र मर्यादा राहील.
कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक आहे.
कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी देखील योजनेत सहभागी होऊ शकतात. मात्र नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचा विमा हप्ता खरीप पिकांसाठी 2 टक्के, रब्बी पिकांसाठी 1.5 टक्के तसेच नगदी पिकांसाठी 5 टक्के इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे.
बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यास कृषि विभागाच्या DBT आधारित योजनांचा लाभ पाच वर्षांसाठी बंद करण्यात येईल.
विमा संरक्षित रक्कम / विमा हप्ता :
चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी पीकनिहाय निश्चित करण्यात आलेली विमा संरक्षित रक्कम तसेच शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र.
पीक
विमा संरक्षित रक्कम (रु.)
शेतकरी विमा हप्ता दर (%)
शेतकरी विमा हप्ता रक्कम (रु.)
1
भात (तांदूळ)
65,000
2.00
1,300.00
2
ज्वारी
33,000
1.00
330.00
3
सोयाबीन
63,250
2.00
1,265.00
4
तूर
47,000
5.00
2,350.00
5
कापूस
65,000
2.00
1,300.00
योजनेंतर्गत पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, हवामानातील प्रतिकूल परिस्थिती किंवा उत्पादनावर परिणाम करणाऱ्या बाबींमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी विमा प्रस्ताव अर्ज भरून जवळच्या बँक शाखा, प्रादेशिक ग्रामीण बँक, प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र, विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थ यांच्यामार्फत विमा हप्ता भरावा.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा किंवा न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सहभागी होण्याची इच्छा नसल्यास अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर संबंधित बँकेकडे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
विमा घेतलेले पीक आणि डिजिटल पीक सर्वेक्षणामध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावत आढळल्यास डिजिटल पीक सर्वेक्षणातील नोंद अंतिम ग्राह्य धरली जाईल. तसेच प्रत्यक्ष पेरलेले पीक व डिजिटल पीक सर्वेक्षणातील नोंद यामध्ये विसंगती आढळल्यास विमा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येऊ शकतो.
खरीप 2026 हंगामासाठी पीक विमा नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरू करण्यात आले आहे.
तरी कोरपना तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन कोरपना तालुका कृषी अधिकारी. गोविंद ठाकूर यांनी केले आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरपना तसेच मंडळ कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.


