धानापूर तलाठी कार्यालय कुलूपबंद अवस्थेत
गावकऱ्यांच्या अडचणीत वाढ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ गावात तलाठी कार्यालय असणे ही कोणत्याही गावासाठी अभिमानाची बाब आहे. कारण महसूल विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे गावातच पूर्ण होतात. पण गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर गावातील वास्तव मात्र याच्या अगदी उलट दिसत आहे. तलाठी कार्यालय मागील वर्षांपासून कुलूपबंद असल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
धानापूरमध्ये तलाठी कार्यालय आहे, पण मागील वर्षांपासून अनेक वेळा त्या कार्यालयाला कुलूप लागलेले दिसते. कार्यालय असूनही गावकऱ्यांना आपल्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. एवढा प्रवास करून गेल्यानंतरही काम होईल याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत आहे.
याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी आपल्या शेतीची कामे बाजूला ठेवून आवश्यक कागदपत्रांसाठी कार्यालयाचे फेरे मारतो. शेतीतील एक दिवस वाया गेला तर त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होतो.
शेतमजुरांची परिस्थितीही वेगळी नाही. रोजंदारीवर काम करणारा मजूर एक दिवस मजुरी सोडून कार्यालयीन कामासाठी जातो, पण काम न झाल्यास त्याचा दिवस आणि उत्पन्न दोन्ही वाया जाते.
विद्यार्थ्यांच्या अडचणी तर आणखी गंभीर आहेत. शाळा, महाविद्यालय, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया किंवा इतर शासकीय योजनांसाठी उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रांची गरज असते. वेळेत कागदपत्रे न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते.
गावात कार्यालय असताना नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी का जावे लागते.?, कार्यालय नियमित सुरू राहणे आणि नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत मिळणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी नाही का.?, जर सर्व कामे तालुकास्तरावरूनच करायची असतील तर इमारतीची गरजच काय..?, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
महसूल विभागाच्या धानापूर साजात धानापूर, करंजी, बोरगाव, चकव्यंकटपूर या गावांचा समावेश असून धानापूर गावात असलेले तलाठी कार्यालय नियमित सुरू करण्यात यावे, महसूल अधिकारी उपलब्ध असावेत आणि नागरिकांची कामे विनाकारण रखडू नयेत, अशी गावकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.



