गोंडपिपरीत रासायनिक खताचा काळाबाजार
खताची कमतरता भासवून जादा दराने खत विक्री ; कृषी विभागाची तपासणी केवळ औपचारिकता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रासायनिक खतांचा काळाबाजार आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कठोर पावले उचलली आहेत. असे असले तरी, गोंडपिपरीसह परिसरातील अनेक कृषी केंद्र संचालकांनी खतांचा तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री करणे आणि शेतकऱ्यांना खतांसोबत इतर अनावश्यक औषधे घेण्यास भाग पाडणे (लिंकिंग) असे प्रकार उघडकीस येत आहेत.
शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच खतांच्या टंचाईचा आणि काळाबाजाऱ्यांचा सामना करावा लागत असताना मात्र अनेक विक्रेते खते टंचाईचा कांगावा करून जादा दराने खत विक्री करीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. इतकेच नव्हे तर विक्रेते आणि मध्यस्थ शासकीय अनुदानाची खते व बियाणे परस्पर गायब करून, ती चढ्या दराने काळ्या बाजारात विकत असल्याचे धक्कादायक प्रकार घडल्याचे सूत्रांकडून समजते.
शेतकऱ्यांना युरिया, डीएपी (DAP) आणि इतर मिश्र खतांसाठी सरकारी दरापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. काही कृषी सेवा केंद्रचालक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून प्रति बॅग १५० ते २०० रुपये जादा उकळत आहेत. याशिवाय, खत हवे असल्यास दुकानदारांकडून जबरदस्तीने इतर महागडी औषधे व कीटकनाशके विकत घेण्याची (लिंकिंगची) सक्ती शेतकऱ्यांवर केली जात आहे.
खतांच्या काळाबाजार आणि साठेबाजीविरोधात कृषी विभागाने राज्यभरात कडक मोहीम उघडली असली तरी प्रत्यक्ष गोंडपिपरी तालुक्यातील एकही कृषी केंद्रावर धाडी टाकून तपासणी करण्याची, खत विक्री केंद्रांवर गुन्हे दाखल करण्याची, आणि परवाने निलंबित व रद्द करण्यात आल्याची घटना उघडकीस आली नसल्याने, कृषी केंद्र संचालक आणि कृषी विभागाचे साटेलोटे तर नाही ना.?, असा प्रश्न सामान्य शेतकरी वर्गाला पडला आहे.
*तालुक्यातील खत तेलंगणात..?*
गोंडपिपरी तालुका हा तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने तेलंगणातील अनेक तेलगू भाषिक “अण्णा” तालुक्यात ठाण मांडून बसले आहेत. धाबा, विठ्ठलवाडा, भंगाराम तळोधी, बोरगाव यासह अनेक गावामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेऊन शेती करीत आहेत. याच अण्णांच्या मदतीने काही कृषी केंद्र दुकानदार आपल्या गोदामातील खते परस्पर तेलंगणा आणि आष्टी परिसरात पाठवीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हे सर्व घडत असताना, प्रशासनाच्या भरारी पथकातील अधिकारी कुंभकर्णी झोपेत तर नाही ना..?, असा प्रश्न निर्माण होत आहे.



