गोवंश तस्करीविरोधात गोंडपिपरी पोलिसांची यशस्वी कामगिरी
तेलंगणात कत्तलीसाठी जाणाऱ्या तीन बैल, पिकअप वाहनासह ५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ पोलीस विभागाने गोवंश तस्करांविरुद्ध एक धडक आणि मोठी कारवाई केली असून, तालुक्यातील दरूर गावामध्ये करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका संशयित पीकअप तपासणी केली असता तेलंगानात कत्तलीसाठी नेत असलेल्या तीन बैलांना ताब्यात घेण्यात आले. कोणतीही वैद्य कागदपत्रे नसतांना कत्तलीच्या उद्देशाने तेलंगणा राज्यात बेकायदेशीरपणे वाहून नेले जाणारे तीन गोवंशीय बैल पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी या प्रकरणी दोन तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तब्बल ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत दरूर गाव परिसरातून अवैधरित्या गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ दरूर गावात नाकेबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली. यावेळी एमएच ३४ बीझेड ८३८९ क्रमांकाचे पीकअप वाहन संशयास्पदरित्या येतांना आढळून आले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन गोवंशीय बैल अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून ठेऊन त्याची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. वाहनचालकांची चौकशी केली असता त्याने आपले नाव महेश नीलकंठ बोरकुटे ( ३६ वर्षे ) राह. बोंडाला तह. मूल असे सांगितले. त्याच्याकडे संबंधित जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेले कोणतेही वैद्य कागदपत्रे आणि परवाने उपलब्ध नव्हते.
पुढील चौकशीत आरोपीने सदर गोवंशीय जनावरे अमन खान ( राह. तेलंगणा ) यांची असून ती कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पीकअप वाहन, तीन गोवंशीय बैल आणि आरोपीकडील विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५ अ, ५ ब, ९ आणि ११ अन्वये गुन्हा दाखल केला असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे तालुक्यातील गोवंश तस्करीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि पोलिस उप अधीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस उप निरीक्षक मंगेश कराडे, हेड कॉन्स्टेबल कृष्णा रॉय तसेच पोलीस अंमलदार अनुप निकुरे सचिन मोहूर्ले, साईनाथ झुरे यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.



