ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरातील पाणी प्रश्न पेटला… 

नगर पालिकेवर महिलांचा 'हंडा मोर्चा' ; पाणी प्रश्नावरून नगराध्यक्षांच्या दालनात फुटल्या घागरी!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

 पश्चिम विदर्भातील श्री बालाजी महाराजांची पुण्यनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजा शहरात तीव्र उष्णते सोबतच पिण्याच्या पाणी प्रश्न हा गंभीर बनला असून शिक्षणाचे तसेच औद्योगिक क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेल्या शहरातच पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनला असून पंधरा ते वीस दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आठवडाभरात करावा या मागणीसाठी आणि तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ, १९ मे रोजी देऊळगाव राजा शहरातील नागरिक आणि विशेषतः महिलांच्या वतीने नगरपालिकेवर एक भव्य आणि आक्रमक ‘हंडा मोर्चा’ काढण्यात आला. गेल्या १५ ते २० दिवसांआड होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी आज थेट नगराध्यक्षांच्या दालनात घुसून घागरी फोडत प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली

शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने आज शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि महिला रस्त्यावर उतरल्या. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली. हातात रिकामे हंडे आणि घागरी घेऊन महिलांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. हा मोर्चा थेट नगरपालिकेत धडकला. महिलांचा संताप इतका तीव्र होता की, त्यांनी थेट नगराध्यक्षांच्या दालनात प्रवेश करून लोकप्रतिनिधींसमोरच अक्षरशः घागरी फोडून आपला रोष व्यक्त केला.

सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी आणि प्रशासनाचा निषेध

या आंदोलनामध्ये शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. आंदोलकांनी पालिकेच्या जल वितरण संदर्भातल्या ढिसाळ कारभाराचा आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा तीव्र शब्दात निषेध केला. मोर्चादरम्यान परिस्थिती कमालीची आक्रमक झाली होती, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

 *आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पोलीस प्रशासनाची महत्त्वाची भूमिका* आंदोलनकर्त्यांनी मार्गक्रमण करीत नगरपालिकेवर धडक दिली यावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलन करताना मुख्य प्रवेशद्वारावर थांबवले असता आंदोलक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी आणि पोलीस पथकाने परिस्थिती योग्यरीत्या हाताळली त्यामुळे पुढील अनर्थ टळला आंदोलनकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या बॅरिकेट वरून आज जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी प्रशासन आणि आंदोलन कर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणली *पालिकेचे आश्वासन: ८ दिवसांत पाणी प्रश्न मार्गी लावणार*

आंदोलनाचा वाढता दबाव पाहून नगराध्यक्ष माधुरी शिपणे, उपनगराध्यक्ष वनिता भुतडा आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी आंदोलकांशी चर्चा केली. शहरातील मुख्य पाईपलाईनला असलेले लीकेज आणि तांत्रिक अडचणी येत्या ८ दिवसांत दुरुस्त करून, नागरिकांना नियमित टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी आंदोलकांना पाणी वितरणा संदर्भात सविस्तर माहिती यावेळी दिली आणि त्यावर तोडगा कसा काढला जाईल हे सुद्धा अवगत केले, पाणीपुरवठा संदर्भातल्या तांत्रिक तसेच कृत्रिम अडचणी वर येत्या काही दिवसात मात करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात पालिका प्रशासन अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले

*तर याहून तीव्र आंदोलन करू इशारा*

प्रशासनाने जरी आठवडाभराची मुदत मागितली असली, तरी दिलेल्या मुदतीत जर हे आश्वासन पूर्ण झाले नाही आणि पाणी प्रश्न सुटला नाही, तर यापेक्षाही अधिक तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा शहरातील विरोधी पक्षनेते आणि संतप्त नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता देऊळगाव राजाचा पाण्याचा प्रश्न नेमका कधी सुटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. *ह्या कराव्या उपाययोजना* पालिका प्रशासनाने प्रथम ठिकठिकाणी पाणीपुरवठा पाईपलाईनचे झालेले लिकेज काढावे त्याचप्रमाणे काही प्रभागातील नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या मुख्य लाईनवर कनेक्शन जोडल्यामुळे पाणीपुरवठा सुरू होताच दिवसभर संबंधित नळांना पाणी असते याचे सर्वेक्षण करून संबंधित न कनेक्शन बंद करून पालिकेचे नियमाप्रमाणे जोडणी करून देण्यात यावी, सर्व नळ कनेक्शन धारकांच्या नळांना तोट्या असाव्यात, आपले पाणी झाल्यानंतर घरासमोरील परसबागांना तसेच इतर कामासाठी हे पाणी वापरता येऊ नये या संदर्भात प्रभावी जनजागृती करावी, अवैध नळ कनेक्शन चा शहरातील विविध प्रभागात शोध घेऊन संबंधितांना पालिकेतर्फे वैद्य कनेक्शन देण्यात यावे अशा प्रकारच्या उपाययोजना केल्यास शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाची मदत होईल असे जाणकार नागरिक सांगतात

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये