ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

APK फाईलद्वारे मोबाईल हॅक; शेतकऱ्याचे ८.५७ लाख रुपये पोलिसांनी मिळवून दिले परत 

सायबर पोलिसांची मोठी कामगिरी; देऊळगाव राजातील शेतकऱ्याची १०.५१ लाखांची झाली फसवणूक   

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : APK फाईलद्वारे देऊळगाव राजा येथील शेतकऱ्याचा मोबाईल हॅक करून १०.५१ लाखांची फसणवणुक केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी यशस्वी तपास करून फसवणुकीतील तब्बल ८.५७ लाख रुपये शेतकऱ्याला मिळवून दिले आहे. या कारवाईमुळे सायबर पोलिसांच्या तत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन विनायक जपे (वय ४५, व्यवसाय शेती, रा. शनिवार पेठ, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांच्या मोबाईलमध्ये अज्ञात व्यक्तीने APK फाईलच्या माध्यमातून अनधिकृत प्रवेश केला. मोबाईल हॅक करून तक्रारदार यांच्या मोबाईल क्रमांकावरील एसएमएस (SMS) विविध मोबाईल क्रमांकांवर फॉरवर्ड करण्यात आले. त्यानंतर २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत त्यांच्या बँक खात्यातून एकूण १० लाख ५१ हजार ६०२ रुपये विविध खात्यांमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून ७ एप्रिल २०२६ रोजी बुलढाणा सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ०८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(C) व ६६(D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती, त्या संबंधित बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार फसवणुकीतील एकूण ९ लाख ५५ हजार रुपये तत्काळ ‘होल्ड’ करण्यात पोलिसांना यश आले.यापैकी ८ लाख ५७ हजार ४७० रुपये रक्कम Axis Bank नोएडा (उत्तर प्रदेश) शाखेतून न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदारांच्या खात्यात यशस्वीरित्या परत जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम परत मिळविण्यासाठी न्यायालयीन आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोधही घेतला जात आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलीस पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सपोनि प्रमोद इंगळे, पोहेकॉ रामु मुंढे, भारत जंगले, केशव घुबे, प्रशांत गावंडे आणि पंकज मेहेर यांचा सहभाग होता.

दरम्यान, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसारख्या सोशल मीडियावर येणाऱ्या APK फाईल्स डाउनलोड करू नयेत. कोणतीही ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा 1945 वर संपर्क साधावा. तसेच, सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल वर नोंदणी करता येते किंवा जवळच्या पोलीस स्टेशन अथवा सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये