ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानके देशातील आदर्श स्थानके व्हावीत – आ. सुधीर मुनगंटीवार

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे विकासाच्या विविध प्रश्नांवर ठोस पाठपुरावा; नागपूर येथे मध्य रेल्वेच्या डीआरएम बैठकीत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा

चांदा ब्लास्ट

“ताडोबा एक्सप्रेस”, बल्लारशाह–अयोध्या रेल्वे सेवा, प्रवासी सुविधा आणि रेल्वेस्थानके विकासाबाबत आ. मुनगंटीवार यांच्या सूचना

रेल्वे तिसरी लाईन प्रकल्पातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन आणि जमीन अधिग्रहणग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न चर्चेत

चंद्रपूर :_ नागपूर येथील मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर बैठक पार पडली. यावेळी चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांचा देशातील आदर्श आणि मॉडेल स्थानकांमध्ये समावेश व्हावा, या दृष्टीने दर्जेदार व दूरदृष्टीपूर्ण नियोजन करण्यावर आ. मुनगंटीवार यांनी भर दिला. रेल्वे स्थानकांचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता, प्रवाशांना आधुनिक सुविधा, स्थानिक कला-संस्कृतीचे दर्शन आणि परिसराच्या विकासाला चालना देणारा असावा, असे मत बैठकीत त्यांनी व्यक्त केले. यासोबतच रेल्वे प्रवाशांच्या समस्या, चंद्रपूर पुणे व चंद्रपूर मुंबईसाठी दररोज रेल्वे गाडी, नव्या रेल्वे सेवांचे प्रस्ताव, स्थानक पुनर्विकास, अतिक्रमणधारकांचे प्रश्न आणि विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

बैठकीला मध्य रेल प्रबंधक विनायक गर्ग, अमन मित्तल सीनियर डीसीएम ,मंडळ विभागीय अभियंता (सामान्य प्रशासन) रवीमोहन श्रीवास्तव, अजय दुबे सदस्य ZRUCC मध्य रेलवे मुंबई , माजी शहराध्यक्ष भाजपा काशिनाथ सिंग यांच्यासह रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सर्वप्रथम चंद्रपूर, वर्धा आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन कोटा सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय उपस्थित करण्यात आला. अनेक वेळा अत्यावश्यक कारणांसाठी प्रवाशांना तातडीने आरक्षणाची आवश्यकता भासते. त्यामुळे या महत्त्वाच्या स्थानकांवर आपत्कालीन कोटा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

यावेळी बाबूपेठ–सास्ती परिसरातील बीजी रेल्वे लाईन प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाचा विषयही बैठकीत चर्चिला गेला. या प्रकल्पासंदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या आक्षेपांची माहिती देत आ. मुनगंटीवार यांनी संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचे निर्देश दिले. विकासकामे करताना शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार झाला पाहिजे. त्यांना योग्य मोबदला, आवश्यक सुविधा आणि सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मांडली.

चंद्रपूर शहरातील रेल्वेच्या तिसऱ्या लाईन प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या २४ अतिक्रमित घरांचा मुद्दाही बैठकीत प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. रेल्वे विभागाकडून या घरांवर कारवाई प्रस्तावित असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. मुनगंटीवार यांनी मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले की, मी वनमंत्री असताना अतिक्रमणधारकांना मोबदला देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत धोरण तयार करण्यात आले होते. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यापूर्वी बाधित नागरिकांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेतले जावे. यावेळी त्यांनी म्हाडामार्फत मंजूर करण्यात आलेल्या २००४ घरांचाही उल्लेख केला. येत्या वर्षभरात ही घरे पूर्ण होण्याची अपेक्षा असून अतिक्रमणधारकांना अल्पदरात ही घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही स्थगित ठेवण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. तसेच बाधित झोपडीधारकांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्थानकांचा देशातील आदर्श व मॉडेल स्थानकांमध्ये समावेश व्हावा, यासाठी दर्जेदार आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजन करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. ऐतिहासिक बल्लारशाह रेल्वे स्थानकाची ओळख आणि प्रतिष्ठा कायम ठेवत चंद्रपूर येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि मागण्यांचे तातडीने निराकरण करण्यावरही त्यांनी भर दिला.

ताडोबा एक्सप्रेससाठी प्रस्ताव पाठवा

बैठकीत ट्रेन क्रमांक २०१०५/२०१०६ बल्लारशाह–लोकमान्य टिळक टर्मिनस नव्या रेल्वेला “ताडोबा एक्सप्रेस” हे नाव देण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून रेल्वे विभागाने यासंदर्भातील आवश्यक प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना आ. मुनगंटीवार यांनी केली.

ताडोबा एक्सप्रेस चंद्रपूरची नवी ओळख ठरेल

बल्लारशाह–लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वेला “ताडोबा एक्सप्रेस” हे नाव देण्याच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. ताडोबा आणि वाघाच्या थीमवर आधारित आकर्षक डिझाइनने ही रेल्वे सजविण्याचा प्रस्ताव आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला.

प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवा

बल्लारपूर येथील उत्कृष्ट दर्जाच्या टिकवूडचा देशपातळीवर असलेला गौरव अधोरेखित करत आ. मुनगंटीवार यांनी बल्लारशाह–अयोध्या थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी बल्लारपूर येथून टिकवूड पाठविण्यात आले होते. तसेच पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधानांची खुर्ची देखील बल्लारपूरच्या टिकवूडपासून तयार करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांचा विचार करून रेल्वे विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवावा, असे त्यांनी सुचविले.

आधुनिक स्थानके, चंद्रपूर जिल्ह्याची नवी ओळख

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांवरील पुनर्विकासाची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. यावेळी मंडल रेल प्रबंधक विनायक गर्ग यांनी चंद्रपूर रेल्वे स्थानकाचे काम २०२६ अखेर पर्यंत तर बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील काम २०२७ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती दिली.

स्थानकांच्या विकासासोबत संस्कृतीचाही स्पर्श हवा

रेल्वे स्थानकांना स्थानिक कला, संस्कृती आणि जंगल थीमवर आधारित स्वरूप देण्याचाही प्रस्ताव बैठकीत चर्चिला गेला. यासाठी जे.जे. आर्ट संस्थेसोबत बैठक घेण्याची सूचना करण्यात आली. तसेच स्थानकांवर रेल्वेच्या इतिहासाची माहिती प्रदर्शित करण्यात यावी आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असेही निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.यासोबतच बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून विविध रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. बल्लारशाह–पुणे तसेच बल्लारशाह–मुंबई दरम्यान दररोज रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

पुरस्काराने सिद्ध केली चंद्रपूर आणि बल्लारपूर स्थानकांची ओळख

रेल्वे गाड्या आणि स्थानके ही प्रवाशांसाठी केवळ सुविधा नसून परिसराच्या विकासाचे प्रवेशद्वार असतात. त्यामुळे स्थानके आणि रेल्वे गाड्या सर्व सुविधांनी युक्त, आकर्षक आणि आधुनिक स्वरूपाच्या असाव्यात, अशी भूमिका मांडत आ. मुनगंटीवार यांनी आपण वनमंत्री असताना रेल्वे स्थानके सुंदर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते, याची आठवण करून दिली. चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांना देशातील सर्वाधिक सुंदर स्थानक स्पर्धेत १० लाख रुपयांचा पुरस्कार मिळाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये