आशाताईंना आठ महिन्यापासून मानधनाची “आशा”
आठ महिन्यापासून मानधन रखडल्याने आशा व गट प्रवर्तक आर्थिक संकटात _आयटक जिल्हा मेळाव्यात काम बंद आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
केंद्र सरकार कडून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांना मिळणारे मानधन ऑक्टोबर २०२५ पासून थकित असून तो तातडीने देण्यात यावे, आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा प्राप्त करून द्यावा,गट प्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचारी म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६५ करण्यात यावी, यासह विविध मागण्यासाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना संलग्न आयटक च्या वतीने राज्य महासचिव कॉ. श्याम काळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जिल्हा मेळावा दिनांक १८ मे २०२६ रोजी अखिल खेडुले कुणबी समाज सभागृह तुकूम चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला.
या मेळाव्याचे उद्घाटन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे पाटील यांनी केले तर अध्यक्षस्थानी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या लढाऊ नेत्या कॉ. ज्योती अंडरशहरे नागपूर या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संयुक्त खदान मजदुर संघाचे नेते कॉ. जेकब, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. रवींद्र उमाटे, राजू गईनवार, आशा संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ. निकिता नीर, गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष कॉ. सुहासिनी वाकडे, विद्यादेवी येजुलवार, कृषी मित्र संघटनेचे अध्यक्ष किशोर निंबरड, सोनटक्के, आशा संघटनेच्या किरण धोंगडे, वर्षा घुमे, सविता गटलेवार, मीना चौधरी, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे स्नेहल झोडगे, मोहित अलोने, डॉली झोडगे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात स्त्री शिक्षणाची जनक सावित्रीमाई फुले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. मेळाव्यात अनेक आशा आणि गट प्रवर्तक कर्मचारी यांनी ८ महिन्यापासून केंद्र सरकारकडूनचे मानधन थकीत असल्याने आम्ही जगायचे कसे..?, असा संतप्त सवाल करत सरकार विरोधात तीव्र भावना व्यक्त करत घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. जिल्हा परिषद माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार कडे अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु सरकार आशा व गट प्रवर्तक यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. ८ महिन्याचे थकित मानधन त्वरित न मिळाल्यास देशव्यापी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा आयटक चे राज्य महासचिव कॉम्रेड श्याम काळे यांनी दिला आहे.
मेळाव्यात विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यात आले. ज्यामध्ये आशा स्वयंसेविकावर विविध ऑनलाइन कामाचा वाढता ताण टाकला जात आहे, लाभार्थीच्या विविध याद्या , आधार अपडेट, ७० वर्षा वरील लाभार्थी यादी, वंध्यत्व कार्ड यासारखी माहिती सातत्याने ऑनलाईन मागितली जात आहे. मात्र बहुतेक आशाकडे साधे मोबाईल फोन असल्यामुळे त्यांना मानसिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे जो पर्यंत शासनाकडून अत्याधुनिक अँड्रॉइड मोबाईल, सिमकार्ड व पुरेसा डेटा पॅक दिला जात नाही, तो पर्यंत मात्रा ऍपवरील ऑनलाइन कामाची सक्ती करू नये.
६० वर्ष पूर्ण झालेल्या आशांना सेवानिवृत्त करण्याचे आदेश दिले असले तरी सेवानिवृत्ती नंतर त्यांच्या उपजिविकेचे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे आशा व गट प्रवर्तक यांना दरमहा पाच हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे वय ६५ करण्यात यावे. प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा मागील अनेक वर्षाचा थकित मोबदला द्यावा. प्रसूती रजा व आजारपणाची भरपगारी रजा मंजूर करावी. विना मोबदला कामे सांगणे बंद करावे. GPS कॅमेरा मोबाईल द्वारे फोटो काढण्याची सक्ती बंद करावी. राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमस्वरूपी सुरू ठेवावे. ग्राम पंचायत व नगर परिषद, नगर पंचायत स्तरावरून थकित असलेले दरमहा एक हजार रुपये कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता त्वरित द्यावा, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत .
मेळाव्यात आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांच्या मुलांना १०वी १२वी मध्ये ७५ टक्के पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनचा पुस्तक भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते.



