संत कोंडय्या महाराज देवस्थानात सभागृह बांधकामाचे भूमिपूजन संपन्न
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश. ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेतून २० लाखांचा निधी मंजूर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महाराष्ट्रातील विदर्भासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या संतनगरी धाबा येथील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानास सभागृह बांधकामासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेतून २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला असून, या नवीन सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन आज (दि. १९) करण्यात आले.
प्रत्येक वर्षी धाबा येथे माघ शुद्ध तृतीयेला, नववर्षाच्या जानेवारी महिन्यात श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांचा जन्म जयंती महोत्सव साजरा करण्यात येतो. यानिमित्तान विदर्भासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भाविकांकडून मनोभावे पूजा करण्यात येते. या यात्रेला होणाऱ्या गर्दीचे स्वरूप पाहता, सद्यस्थितीत देवस्थानकडे असलेल्या सभागृहाची जागा कमी पडत आहे. नवीन सभागृह बांधकामकरिता देवस्थान समितीच्या वतीने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली. या मागणीचा पाठपुरावा करून नवीन सभागृहाच्या बांधकामाकरिता ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेतून २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून भाविकाकरिता भव्य सभागृह निर्माण करण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन आज संपन्न झाले.
आज, मंगळवार (दि.१९) रोजी सकाळी पार पडलेल्या या भूमिपूजन सोहळ्याला देवस्थानचे अध्यक्ष सुहास माडूरवार, विश्वस्त अशोक रेचणकर, अनिल कोरडे, महेश सोनाकुलवार, तुळशीदास शेगमवार महाराज, व्यवस्थापक हनुमंत चंदनगिरीवार, कोंडय्या महाराजांचे नातजावई विजय मोदी, ओम साई पंडित, नैतिक मोदी, वेद पंडित यांची उपस्थिती होती.



