हिंगणी येथील पुलाची दुरवस्था ; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हिंगणी येथील यशवंत महाविद्यालय शाळेकडे जाणाऱ्या मार्गावरील गावकरी पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून, हा पूल अनेक वर्षांपासून पडलेल्या अवस्थेत आहे. पुलाभोवती मोठ्या प्रमाणात गवत व झाडी वाढल्यामुळे परिसर धोकादायक बनला आहे. या मार्गाने दररोज शाळकरी विद्यार्थी ये-जा करत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वीही येथे काही लहान-मोठ्या घटना घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र संबंधित प्रशासनाने अद्याप या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
सध्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांची चर्चा सुरू असताना, गावकऱ्यांमध्ये “मतदान कोणाला करायचे?” हा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन पुलाचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी नागरिक व पालकांकडून करण्यात येत आहे.



