महाराष्ट्रातील गावात तेलंगणा सरकारकडून जनगणना!
महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद ; १४ वादग्रस्त गावांत दोन्ही राज्यांची समांतर जनगणना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांकडून एकाचवेळी जनगणना सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठा गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकाच व्यक्तीची नावे दोन्ही राज्यांच्या जनगणना यादीत नोंदली जाण्याची शक्यता असल्याने देशव्यापी जनगणनेच्या आकडेवारीवरही परिणाम होणार आहेत.परमडोली, तांडा, कोठा, मुकादमगुडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, महाराजगुडा, पदमावती, इंदिरानगर, अंतापूर, येसापूर, नारायणगुडा, पळसगुडा, भोलापठार आणि लेंडीगुडा या १४ गावांमध्ये तेलंगणा सरकारने मंगळवार पासून जनगणना सुरू केली आहे.महाराष्ट्र सरकारही या गावांत स्वतंत्र जनगणना घेणार असल्याचे समजते.
१९९७ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने हे १४ गावे महाराष्ट्राचीच असल्याचा स्पष्ट निकाल दिला होता. मात्र गेली जवळपास तीन दशके महाराष्ट्र सरकारकडून या निकालाची ठोस अंमलबजावणी न झाल्याने तेलंगणा सरकारने या भागावर आपला प्रभाव वाढवला आहे.
तेलंगणा सरकार मतदारयादीचा आधार घेत इंदिराम्मा घरकुल, रयतुबंधू, निवृत्तीवेतन, पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण सुविधांसह विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. तसेच या गावांत निवडणूक प्रक्रियाही चालवत आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी विधानभवनातील उच्चस्तरीय बैठकीत स्पष्ट भूमिका घेतली होती. “हे १४ गावे महाराष्ट्राचीच आहेत आणि महाराष्ट्राचीच राहतील,” असे ठाम विधान करत त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. तरीही तेलंगणा सरकारकडून जनगणना सुरू झाल्याने स्थानिक नागरिक नाराज आहेत.या सर्व गावांतील रहिवासी पूर्णपणे मराठी भाषिक आहेत. येथे कुणालाही तेलुगू भाषा येत नाही. मुकादमगुडा येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास रणवीर यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन २०१०-११ मध्ये तेलंगणा सरकारने सुरू केलेली जनगणना तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती.परंतु महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही.त्यामुळे २०१०-११ च्या जनगणनेतही दोन्ही राज्यांनी समांतर जनगणना केली होती. आता २०२६-२७ मध्ये पुन्हा हाच प्रकार होत असल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत.
महाराष्ट्र सरकारने या सीमावादाला कायमस्वरूपी निकाल लावून जिवती तालुक्यातील या गावांना स्थिरता द्यावी, अशी मागणी आता जोरदारपणे होत आहे.
• तेलंगणा सरकारकडून सुरू असलेली जनगणना थांबवून महाराष्ट्र सरकारकडूनच या १४ गावात जनगणना करण्यात यावी.यासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर व तहसीलदार जिवती मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे.
– सामाजिक कार्यकर्ते, रामदास रणवीर,मुकादमगुडा,
• कुमरमभिम ( आसिफाबाद) जिल्ह्यातील केरामेरी मंडल अंतर्गत सिमेवरील १४ गावांमध्ये २०२६-२७ ची समांतर जनगणना सुरू केली आहे.यामध्ये पर्यवेक्षक पदकम टि.अजयकुमार, पंचायत सचिव इंगळे रमेश,व गणक नागराज यांचा समावेश आहे.
• सिमेवरील वादग्रस्त १४ गावापैकी असलेल्या मुकादमगुड्यात मंगळवारी तेलंगणा सरकारकडून सुरू असलेल्या जनगणनेचा येथील नागरिकांनी विरोध केला होता कारण गेल्या अनेक वर्षांपासून या सिमा भागात वास्तव्यास असतानाही अनुसुचित जाती समुदायाला तेलंगणा सरकारने जमिनीचे पट्टे दिले नाहीत.यावरून नागरीकांचा रोष होता यावर तेलंगणाचे पर्यवेक्षक पदकम टि.अजयकुमार यांनी उपस्थित नागरिकांना तेलंगणा सरकारकडून राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती व जनगणना संदर्भात माहिती देत नागरिकांचा रोष कमी करत नागरीकांना जनगणना करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.


