गोंडपिपरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुका प्रशासनामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा – १)” अंतर्गत पंचायत समिती सभागृह, गोंडपिपरी येथे आज शुक्रवार (दि.८) रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत भव्य महसूल समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायत गोंडपिपरीचे मुख्याधिकारी विवेक चौधरी, तहसीलदार शेलवटकर, नायब तहसीलदार चंद्रशेखर वेटे, नगरसेवक चेतनसिंह गौर, राकेश पूण यांची उपस्थिती होती.
सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांचे शासकीय विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न व तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले. प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक करण्याचा यामागील मुख्य हेतू सफल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या असून प्रलंबित प्रकरणांचे तत्परतेने निवारण करण्यात आले. नागरिकांना कार्यालयीन फेऱ्यांपासून दिलासा देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश सफल करण्यात आला.
महसूल विभागामार्फत फेरफार प्रकरणांचे निवारण, ७/१२ व ८-अ उताऱ्यांतील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल उतारे वितरण, वारस नोंदी, विविध दाखले वितरण तसेच पीएम किसान, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांबाबत तक्रार निवारण करण्यात आले. तसेच लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत महिलांचे नाव ७/१२ वर नोंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
याशिवाय आरोग्य विभागाकडून सिकल सेल अनेमिया, बीपी, शुगर तपासणी, आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी, महिला व बाल आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्यात. पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचे मोफत लसीकरण व औषध वाटप करण्यात आले तर कृषी विभागाकडून पीक व्यवस्थापन व शेतकरी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भूमी अभिलेख विभागाकडून स्वामित्व सनद वितरण व नकाशा मार्गदर्शन, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत खाते उघडणी व विमा नोंदणी, तसेच आधार अद्ययावत सेवा, युवकांसाठी करिअर मार्गदर्शन आणि मावीम अंतर्गत महिला बचत गटांचे स्टॉलही यावेळी उपलब्ध करून नागरिकांना मोफत सेवा देण्यात आल्यात.
गोंडपिपरी तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेऊन “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” यशस्वी करण्यात हातभार लावला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महसूल मंडळ अधिकारी सुकेसिनी कांबळे, तलाठी दीपक झाडे यांच्यासह तलाठी, महसूल सेवक तसेच महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले



