ओ.बी.सी.ची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करा
पंतप्रधानांना पाठविणार 5000 पोस्टकार्ड पत्रे — नितीन गोहने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने ओ.बी.सी. समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी देशाचे पंतप्रधान यांना 5000 पोस्टकार्ड पत्रे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री. नितीन गोहने यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सन 1931 नंतर देशात ओ.बी.सी. समाजाची जातीनिहाय जनगणना झालेली नाही. त्यामुळे समाजाची खरी लोकसंख्या, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध नाही. परिणामी अनेक योजनांमध्ये ओ.बी.सी. समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“देशात शेळी, मेंढी, कुत्रे यांची जनगणना होते, मग ओ.बी.सी. समाजाची जातीनिहाय जनगणना का होत नाही?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारने तातडीने स्वतंत्र जातीनिहाय जनगणना जाहीर करावी, अशी मागणी केली.
या मागणीसाठी सावली तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून, पंतप्रधानांना 5000 पोस्टकार्ड पत्रे पाठवून ओ.बी.सी. समाजाच्या भावना पोहोचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या अभियानात युवक, महिला व विविध सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे.



