ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समुद्रपूर पोलिसांतर्गत लसणपूर येथे ‘संवाद उपक्रम’ संपन्न

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी साधला जनतेशी थेट संवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय वाढवून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘संवाद’ उपक्रमांतर्गत आज, ७ मे २०२६ रोजी मौजा लसणपूर (ता. समुद्रपूर) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

सकाळी १०:०० ते ११:४५ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात केवळ पोलीस विभागच नव्हे, तर महसूल, पंचायत समिती, आरोग्य, कृषी, विद्युत, वन विभाग आणि प्रशासकीय स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या माध्यमातून एकाच छताखाली नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळाली.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल साहेबांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून पोलीस विभागाशी संबंधित असलेल्या तसेच इतर विभागांच्या अडचणी समजून घेतल्या. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासोबतच, पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी कशी मदत करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमामुळे पोलीस प्रशासन आणि विविध शासकीय विभागांबद्दल नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले, ग्रामीण भागात ठाणेदार स्वतः प्रत्येक महिन्यात किमान ४ गावांमध्ये ‘संवाद’ बैठकांचे आयोजन करतील. वामध्ये ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्यासह युवक-युवतींचा सहभाग घेतला जाईल. सायबर पोलिस स्टेशन, डायल ११२, महिला सुरक्षा, नवीन कायदे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसारख्या विषयांची माहिती नागरिकांपर्यन्त पोहचविण्यात येईल.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, समुद्रपूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढलेले नागरिकांचे हरवलेले मोबाईल संच. हे मोबाईल पोलीस अधीक्षक महोदयांच्या हस्ते संबंधित मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले. आपला हरवलेला ठेवा परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस दलाचे आभार मानले.

या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगणघाट) श्री. सुशीलकुमार नायक, पोलीस स्टेशन समुद्रपूरचा स्टाफ, विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि लसणपूर परिसरातील सुमारे २५० ते ३०० प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये