करंजी सेवा सहकारी संस्थेचा उपाध्यक्ष कोण होणार..?
रिक्त जागेसाठी (दि.८) ला मतदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्ष पदाच्या रिक्त जागेसाठी आज (दि. ८) निवडणूक होत आहे. यासाठी चुरस बघायला मिळत आहे. या सेवा सहकारी संस्थेवर निमगडे गटाचे वर्चस्व आहे.अशातच येथील उपाध्यक्ष अनिल आत्राम यांचे आकस्मिक निधन झाले. रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवड होत आहे. संस्थेचे संचालक दिलीप वासेकर, हरिचंद्र चापले आणि समीर निमगडे यांची नावे चर्चेत आहेत. यात उपाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार,हे पाहणे औत्सुत्याचे ठरणार आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील मोठ्या असलेल्या करंजी आदिवासी सेवा सहकारी संस्थेअंतर्गत करंजी, जोगापूर, धानापूर, व्यंकटपूर, आक्सापूर, चेकपेल्लुर, कन्नाळगांव आणि गणपुर या ८ गावांचा समावेश आहे. साधारणपणे ७५० सभासद असलेल्या या संस्थेकडे आदिवासी विभागाअंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्र आणि गोंडपिपरी तालुक्यातील सर्वात मोठे स्वस्त धान्य दुकान आहे.१३ संचालक असलेल्या या संस्थेत उपाध्यक्षसह इतर दोन संचालक मय्यत आहेत. उपाध्यक्ष अनिल आत्राम यांच्यासह संचालक राहिलेले अरुण मडावी, मोरेश्वर कुडमेथे यांचे निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर होणारी उपाध्यक्षाची निवड चुरशीची ठरणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील ही निवड अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. यासाठी म्हणून दिलीप वासेकर, हरिचंद्र चापले आणि समीर निमगडे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. या संस्थेत कमलेश निमगडे आणि तुकेश वानोडे असे दोन गट सक्रिय आहेत. सध्या स्थितीत या संस्थेवर निमगडे गटाचे वर्चस्व आहे. अशावेळी आज होणाऱ्या उपाध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे



