बोगस डॉक्टरांचा ग्रामीण भागातील रुग्णांशी खेळ
नावापुरती डिग्री, गावागावात बस्तान, कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात बोगस डॉक्टरांचा वाढता सुळसुळाट गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. पात्रता नसलेल्या बंगाली व मराठी डॉक्टरांकडून सर्रासपणे रुग्णांची तपासणी व उपचार केले जात असल्याचे चित्र समोर येत असून यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे थकवा, उष्माघात, ताप, उलट्या, जुलाब, अशक्तपणा यासारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीचा फायदा घेत अनेक अपात्र व्यक्ती नामधारी डिग्रीच्या भरवशावर स्वतःला डॉक्टर म्हणून रुग्णांची तपासणी करत आहेत.
तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये रुग्णांच्या घरी जाऊन उपचार देणे, क्लिनिकची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी रुग्णांना सलाईन लावणे, फोनवर आपल्या वरिष्ठांचा सल्ला घेऊन उपचार करणे यांसारखे प्रकार या बोगस डॉक्टरांकडून होत आहेत. अशा बोगस डॉक्टरांचे जाळे तालुक्यातील गावागावात पसरलेले असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
विशेष म्हणजे या सर्व प्रकाराकडे आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा जणू काही मूंग गिळून गप्प असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तातडीने लक्ष घालून विशेष पथक नेमावे आणि बोगस डॉक्टरवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.



