विविध योजनांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळेच महाराष्ट्र प्रगतीशिल राज्य – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिन उत्साहात साजरा ; पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
थकीत पात्र शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ ; पीएम किसान व सन्मान निधीतून 129 कोटीचे सहाय्य
82 हजार शेतकऱ्यांना 143 कोटीची वीज बिल माफी
वर्धेत न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्र
वर्धा : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर विकासाच्याबाबतीत राज्याने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. शेती, सिंचन, ऊर्जा, जलसंधारण, रोजगार, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात भक्कमपणे काम केले. गेल्याकाही वर्षात सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या आणि चांगल्यापणे राबविल्या. त्यामुळेच आज एक प्रगतीशिल राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. जिल्ह्यात देखील विकासाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापनादिनानिमित्त पालकमंत्र्यांच्याहस्ते पोलिस कवायत मैदानात ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीस पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी शहीद झालेल्या तसेच राज्य स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांना अभिवादन केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेला आपला जिल्हा देखील विकासाच्याबाबतीत मागे नाही. जिल्ह्यात विकासाचे विविध कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, या भावनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
नुकत्याच संपलेल्या वर्षात 55 हजार शेतकऱ्यांना 888 कोटी रुपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आले. यावर्षी 1 हजार 100 कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे आपले उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेप्रमाणेच राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरु केली. या दोनही योजनेतून प्रतिवर्षी १२ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकऱ्यांना १२९ कोटी रुपयांचे सहाय्य वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांचा विजेचा भार कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेद्वारे जिल्ह्यातील ८२ हजारावर पात्र शेतकऱ्यांना १४३ कोटींची वीज बिल माफी देण्यात आली आहे. बोर आणि धाम या प्रकल्पाची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाकडून ४२९ कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून घेतला. यातून प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेची कामे होणार आहे.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे उद्योग उभे राहिले. यातील १ हजार ७२ उद्योगांना २४ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला. ८५० पेक्षा जास्त उद्योग कार्यान्वित झाले. या उद्योगांना ९ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. मागील वर्षात अवकाळी पाऊस, गारपीट तसेच अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त २ लाख ३४ हजारावर शेतकऱ्यांना ४४४ कोटी ५७ लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पाला निसर्ग पर्यटनाची जोड देण्यासाठी आपण बोरधरण निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करतो आहे. यासाठी १० कोटी २३ लक्ष रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवतो आहे. त्यापैकी ९०० शाळांमध्ये कॅमेरे बसविण्यात आले. प्राथमिक शाळा आपण आदर्श शाळा करतो आहे. पहिल्या टप्प्यात ८ शाळांमध्ये आदर्श शाळा उपक्रम राबविला जात आहे.
बाल वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रमण सायन्स सेंटर नागपूर व बंगळूरु येथील इस्त्रो तसेच अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन, कुप्पम येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. युवकांना उद्योजक बनविण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गेल्यावर्षात ५७६ प्रस्ताव मंजुर करण्यात आले. टाटा टेक्नॅालॅाजीच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे सेंटर फॅार इन्वेंशन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग आपण सुरु करतो आहे. यामुळे युवकांना इंडस्ट्री ४.० नुसार तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विदर्भातील सेंटर वर्धेत होणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महिला स्वयंसहायता गटाची चळवळ उभी राहिली आहे. जिल्ह्यात १ लाख ४२ हजारावर महिला लखपती दिदी झाल्या. महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंच्या विक्रीला चालना देण्यासाठी वर्धा येथे वर्धिनी मॅाल तर हिंगणघाट व आर्वी येथे तालुका विक्री केंद्रे उभारण्यात आले. २० कोटी रुपये खर्च करून ‘उमेद मॅाल बांधतो आहे. जिल्ह्यासाठी स्वतंत्र ‘वन भवन’ आपण मंजूर करून घेतले. २३ कोटी २९ लक्ष रुपये खर्च करून भवनची ईमारत बांधण्यात येणार आहे.
वर्धा येथे लघु न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेसह सुसज्ज निवासी न्याय सहायक वैज्ञानिक प्रशिक्षण केंद्र सुरु करतो आहे. त्यासाठी ११ कोटी ९७ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी वर्धा, हिंगणघाट व देवळी शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी १० कोटी ६५ लाख रुपये आपण दिले. यावर्षी पुलगाव व आर्वी शहरासाठी १० कोटी मंजूर करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हिंगणघाट, पोलिस स्टेशन हिंगणघाट व आर्वीच्या इमारत बांधकामासाठी १२ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून बांधकामे सुरु असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यात नव्याने ७ ठिकाणी पोलिस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतींसह १० ठिकाणी ५१६ निवासस्थाने बांधण्याकरीता मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलाला विविध प्रकारची ३० अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
देशाच्या १६ व्या जनगणनेची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिला टप्पा १ ते १५ मे या कालावधीत पार पडणार आहे. जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिकांना जनगणनेच्या प्रक्रियेत सहभागाची संधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात डिजीटल स्वरुपात होणाऱ्या स्व-गणनेत नागरिकांनी सहभागी होऊन राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे. आरोग्य विभागाच्यावतीने ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्याला निरोगी, सशक्त व समृद्ध बनविण्यासाठी प्रत्येकाने अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील याप्रसंगी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस परेडचे निरिक्षण केले. पोलिस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते सत्कार तथा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



