ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा तालुक्यात जनगणना 2027 अंतर्गत स्वगणना अभियानास प्रारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

भारत सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या जनगणना 2027 कार्यक्रमांतर्गत पोंभुर्णा तालुक्यात जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे प्रारंभ झाला असून नागरिकांनी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून स्वगणना (Self Enumeration) करावी, असे आवाहन तहसील कार्यालय पोंभुर्णा यांनी केले आहे.

यंदाच्या जनगणनेत प्रथमच नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा सोयीची, जलद व पारदर्शक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अधिकृत जनगणना पोर्टलवर मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करून कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरावी. फॉर्म सादर केल्यानंतर १६ अंकी Unique ID प्राप्त होणार असून ती प्रगणक किंवा सुपरवायझर यांना दाखविणे आवश्यक राहणार आहे.

दरम्यान, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरगणना (House Listing) प्रक्रिया १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. यासाठी नियुक्त प्रगणक व सुपरवायझर नागरिकांच्या घरी भेट देणार आहेत.

स्वगणनेमुळे माहितीतील त्रुटी कमी होण्यास मदत होणार असून शासनाला अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल. या माहितीच्या आधारे भविष्यातील शासकीय योजना, विकास आराखडे, निधी वितरण व सामाजिक कल्याण योजनांचे प्रभावी नियोजन करता येणार आहे.

ज्या नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया स्वतः करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र तसेच इंटरनेट सेवा केंद्रांमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रशासनाने जनगणना कायदा १९४८ अंतर्गत माहिती देणे बंधनकारक असल्याचे नमूद करत नागरिकांनी अचूक, संपूर्ण व सत्य माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून तिचा वापर कोणत्याही कर आकारणी किंवा चौकशीसाठी केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तहसील प्रशासनाकडून गावपातळीवर जनजागृती मोहीम, बॅनर, सोशल मीडिया संदेश व ग्रामसभांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. युवक, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक संस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

“स्वतः स्वगणना करा – देशाच्या विकासात सहभाग नोंदवा”, असे आवाहन तहसील कार्यालय पोंभुर्णा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये