ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“कार्यशाळेला शेतकऱ्यांचा बहिष्कार; खडकपूर्णा प्रकल्पाविरोधात संतापाचा स्फोट!”

“कागदोपत्री सिंचन, प्रत्यक्षात कोरडी शेती; अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा जाब”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2026 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “पाणी वापर संस्था सक्षमीकरण कार्यशाळे”ला लाभधारक शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने प्रशासनाचा उपक्रमच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आई भवानी मंगल कार्यालय, नारायणखेड रोड, देऊळगाव मही येथे दिनांक 27 रोजी झालेल्या या कार्यक्रमात संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते; मात्र अपेक्षित असलेले शेतकरी आणि पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर गैरहजर राहिले.

कार्यकारी अभियंता खडकपूर्णा विभाग, देऊळगाव राजा तसेच लघु पाटबंधारे विभाग, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला केवळ दहा-बारा लाभधारक शेतकरी उपस्थित राहिल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत तब्बल 61 पाणी वापर संस्था कार्यरत असून, त्यामध्ये सुमारे 10,132 महिला व 29,540 पुरुष सदस्यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या तुलनेत अल्प उपस्थितीमुळे कार्यक्रमाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थित शेतकऱ्यांनी खडकपूर्णा प्रकल्पाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “धरणात पाणी असूनही आम्हाला शेतीसाठी मिळत नाही,” अशी तक्रार करत शेतकऱ्यांनी पाटाच्या अभावामुळे सिंचनात अडथळे येत असल्याचे सांगितले. काही ठिकाणी शेतकऱ्यांना दगड व पत्र्याच्या साहाय्याने पाणी अडवून शेती करावी लागत असल्याचे वास्तवही मांडण्यात आले.

उपसा सिंचन टप्पा क्रमांक १ ते ४ अंतर्गत पाटचारीची कामे कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखविले जात असले, तरी प्रत्यक्षात ही कामे अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या आठ-दहा वर्षांपासून पाणी वापर संस्था सातत्याने हा प्रश्न मांडत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावर भाषणे झाली; मात्र लाभधारक महिला अनुपस्थित राहिल्याने या चर्चेलाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उपस्थितांमध्ये प्रामुख्याने विभागातील महिला अधिकारी व कर्मचारीच असल्याचे चित्र दिसले.

या वेळी देऊळगाव घुबे येथील घुबे यांनीही उपस्थित राहत पाणी वापर संस्थांच्या अडचणी व अपूर्ण कामांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तर खडकपूर्णा पाणी वापर संस्थेचे माजी अध्यक्ष मधुकर शिंगणे यांनी नियोजनशून्य कारभारावर तीव्र टीका करत अपूर्ण कामांवर ताशेरे ओढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कार्यकारी अभियंता डावरे मॅडम यांनी “कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागते,” अशी प्रतिक्रिया देत कार्यक्रमाची सांगता केली. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस उत्तर न मिळाल्याने नाराजी कायम असल्याचे दिसून आले.

दरम्यान, प्रशासनाच्या या कार्यशाळा केवळ कागदोपत्रीच राहतात का, असा सवाल उपस्थित होत असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये