ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसच्या २५०० चिमुकल्यांचा कोळशाच्या धुराड्यात गुदमरतोय श्वास

सुस्त मप्रनि मंडळाच्या बेजबाबदार अधिकाऱ्याबद्दल खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली 'तीव्र नाराजी'

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ घुग्घुस येथील माउंट कार्मेल स्कूलमधील २५०० निष्पाप विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी ‘एसीसी’ कंपनीच्या कोल डम्पिंग यार्डद्वारे खेळला जाणारा जीवघेणा खेळ आता चव्हाट्यावर आला आहे. शाळेला अगदी खेटून असलेल्या या यार्डमधून उडणारी विषारी कोळशाची धूळ चिमुकल्यांच्या फुफ्फुसांत घर करत असून, त्यांचे भविष्य धूसर होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२४ मध्ये नोटीस बजावूनही तब्बल तीन वर्षे यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाच्या या “कागदी घोडे” नाचवण्याच्या वृत्तीमुळे आज हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य टांगणीला लागले असून जनक्षोभाचा ज्वालामुखी उसळला आहे.

या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यादव यांचा संतापजनक आणि बेजबाबदार चेहरा समोर आला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून कारवाईचे निर्देश दिले असता, “पुढच्या आठवड्यात बघतो,” असे बेजबाबदार उत्तर यादव यांनी दिले. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घुग्घुसमध्ये जाण्यासाठी चक्क आठवडाभराची मुदत मागणाऱ्या या अधिकाऱ्याचा हेतू नक्की काय? असा जळजळीत सवाल यावेळी उपस्थित झाला. या उत्तराने खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाधिकारी पंत यांनी अधिकारी यादव यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना कडक ताकीद दिली. तसेच उद्याच्या उद्या (गुरुवारी) घटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करण्याचे कठोर फर्मान जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून मप्रनि मंडळाचा सुस्त कारभार केवळ कागदोपत्री नोटिसांचा खेळ खेळण्यात मग्न आहे. यामुळे प्रशासन कोळसा माफियांना अभय देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाचा सौदा करत आहे का? असा बोचरा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणात आज भीती आणि आजाराचे सावट पसरले असून, अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीअभावी हा प्रश्न प्रलंबित राहणे हे अत्यंत खेदजनक आहे. भविष्यातील पिढीच्या आरोग्यापेक्षा कोल डम्पिंग यार्डचे हित जोपासणाऱ्या अशा संवेदनाहीन अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी याप्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. “जर उद्यापर्यंत या प्रदूषणावर ठोस कारवाईचा अहवाल प्राप्त झाला नाही, तर तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल,” अशी ठाम गर्जना त्यांनी केली आहे. २५०० चिमुकल्यांच्या आयुष्याशी खेळणारा हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तातडीने या डम्पिंग यार्डवर हातोडा चालवावा, अन्यथा यातून निर्माण होणाऱ्या जनक्षोभाची सर्वस्वी जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची असेल, असा इशाराही या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये