ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वप्नील मेश्रामची कविता समग्राशी संवाद साधणारी आहे. ॲड. लखनसिंह कटरे 

स्वप्नील मेश्राम लिखित 'फितूर दिवसांचे संदर्भ' कवितासंग्रहाचा पार पडला लोकार्पण सोहळा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – युवा कवी स्वप्नील मेश्राम यांचा फितूर दिवसांचे संदर्भ हा कवितासंग्रह केवळ त्याची शब्दशैली प्रगट करत नाही तर समग्राशी संवाद साधते. त्याच्या कवितेतून वेगवेगळे जागतिक आणि भावनिक संदर्भ आपण इतक्या खोलवर तपासू शकतो की ज्यामुळे आपली अस्वस्थता वाढत जाते. असे प्रतिपादन मान्यवर पाहुण्यांनी व्यक्त केले.

सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूरच्या वतीने तसेच अष्टगंध प्रकाशन, ठाणे द्वारा प्रकाशित युवा संवेदनशील कवी स्वप्नील रमेश मेश्राम यांच्या ‘फितूर दिवसांचे संदर्भ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन दिनांक १२ एप्रिल रोजी नुकतेच झाले, त्याप्रसंगी मान्यवर बोलत होते. कवितासंग्रहाचे प्रकाशन स्वप्नील मेश्राम यांचे आई वडील श्री रमेश आणि शीतल मेश्राम यांचे हस्ते झाले.अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे नवनियुक्त सदस्य आणि प्रख्यात कवी ॲड. लखनसिंह कटरे होते. भाष्यकार म्हणून सुप्रसिद्ध स्तंभलेखक आणि समीक्षक डॉ. अजय देशपांडे आणि डॉ. युवराज गंगाराम उपस्थित होते. डॉ. जयश्री कापसे गावंडे यांची विशेष उपस्थिती होती.

या सोहळ्यात प्रसिद्ध समीक्षक व स्तंभलेखक, वणी येथील डॉ. अजय देशपांडे यांनी कवितासंग्रहाविषयी भाष्य करतांना सांगितले की, स्वप्नीलची कविता केविन कार्टर या जगप्रसिद्ध फोटोग्राफर सारखे संवेदनशीलपणे विचार करणारी आहे. स्वप्नील जागतिक विचार करतो, तेव्हा तो जागतिक विचार करणे हेच कविता संग्रहाचे महत्व ठरते. केविन कार्टर आणि आमच्या घरातला माठ ह्या दोन कविता कवितासंग्रहाचे महत्व वाढवते म्हणून हा एकूण कवितासंग्रह उत्तम झाला आहे असे माझे ठामपणे मत आहे. तसेच प्रसिद्ध कवी तथा समीक्षक, नागपूर येथील प्रा. डॉ. युवराज गंगाराम यांनी भाष्यकार म्हणून आपल्या मनोगतात कवितासंग्रहाविषयी महत्त्वपूर्ण भाष्य करताना सांगितले की, स्वप्नील च्या संग्रहाची प्रस्तावना लिहितांना मी अतिशय अस्वस्थ झालो म्हणून त्याची कविता आजच्या वर्तमान युगात फार मला महत्वाची वाटते. तो संवेदनशील विचार करतो तेवढाच तो संविधानशील विचार करतो हे आवर्जून सांगावेसे वाटते.

पहीलाच कवितासंग्रह असला तरी यातील एक एक कविता म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात उमटणारी हळवे स्पंदने आहे. कवितांमधून व्यक्त झालेली स्वप्नीलची संवेदनशीलता, जीवनाकडे पाहण्याची सखोल दृष्टी आणि काळाची जाणीव अत्यंत प्रभावी आहे. असे प्रतिपादन डॉ. जयश्री कापसे गावंडे यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून ॲड. लखनसिंह कटरे यांनी आपली अंगठी अंधारात हरवलेली आहे आणि आपण ती उजेडात शोधण्याचा प्रयत्न करतो आहे असे वक्तव्य केले. भूमिका मांडताना त्यांनी सांगितलं की अनेक प्रश्न आहेत जे आपल्याला अंधारात घेऊन जात आहे पण तरीही आपण त्या प्रश्नांची उत्तरे उजेडात सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण उजेडामध्ये अंगठी शोधणे थोडे सोयीस्कर असते ,परंतु आपल्याला आपली हरवलेली अंगठी अंधारात शोधायची आहे.

दरम्यान स्वरयोगिनी आशा भोसले यांच्या निधनाची बातमी आल्याने कार्यक्रमात आशाताईंना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप देशमुख यांनी केले तसेच संचालन सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख यांनी केले. यावेळी संजय रामटेके, सुरेश नारनवरे आणि अपेक्षा शेंडे यांनी स्वप्नील मेश्राम यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन केले. आभार कवयित्री सीमा भसारकर यांनी केले. साहित्यप्रेमी नागरिक प्रकाशन सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये