शासनाच्या जाचक नियमांविरोधात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद
शेतकरी संकटाच्या छायेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राज्यभरातील कृषी सेवा केंद्रांनी शासनाच्या जाचक नियमांविरोधात २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद पुकारला असून, त्याचा मोठा परिणाम खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र फर्टिलायझर्स भद्रावती डीलर्स असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत भद्रावती तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशननेही १०० टक्के बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खते, बियाणे, कीटकनाशके यांसारख्या अत्यावश्यक कृषी निविष्ठांचा पुरवठा ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे. या करता शासनाला तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले खरीप हंगाम अगदी तोंडावर असताना शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांची अत्यंत गरज असते. अशा काळात कृषी सेवा केंद्रे बंद राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीपूर्व तयारीवर याचा थेट परिणाम होणार असल्याने ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे. कृषी सेवा केंद्र चालकांनी शासनाच्या विविध नियमांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कृषी विभागाकडून सातत्याने होणाऱ्या त्रासदायक कारवाया, कठोर अटी आणि दंडात्मक धोरणांमुळे विक्रेते मेटाकुटीस आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः बियाण्यांची विक्री केवळ मोबाईल अॅपद्वारेच करण्याची सक्ती, रासायनिक खत कंपन्यांकडून केली जाणारी ‘लिंकिंग’ पद्धत, तसेच अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या प्रश्नावर शासनाची भूमिका यामुळे विक्रेत्यांमध्ये असंतोष वाढला आहे. याशिवाय, सीलबंद कीटकनाशके विकल्यानंतरही दोष आढळल्यास विक्रेत्यांवरच दंडात्मक कारवाई केली जाते, असा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक व प्रशासकीय त्रासही आंदोलनाचे एक प्रमुख कारण असल्याचे डीलर्सनी सांगितले. या पार्श्वभूमीवर भद्रावती येथील अॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला तहसीलदार मार्फत निवेदन सादर केले. यावेळी अनधिकृत एजंटमार्फत होणारी बेकायदेशीर खतविक्री तातडीने रोखावी, तसेच अधिकृत विक्रेत्यांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. भद्रावती तालुका अॅग्रो असोसिएशनचे अध्यक्ष किशोर दिवसे, उपाध्यक्ष शामसुंदर उरकुडे, सचिव अमोल पोटे यांच्यासह श्रीकांत पिसे, संतोष खडतकर, अभिजित तन्निरवार, पांडूरंग बारतीने, सचिन जिवने दिनेश विरुटकर,नरेश काळे,शरद झाडे,प्रभाकर चाफले,राहुल पिदुरकर,महेश वांढरे,मनोज ठेंगणे,श्रिकांत टोंगे, आदी सदस्यांनी सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या बेमुदत बंदमुळे खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकरी आणि कृषी व्यवसायिक दोघेही अडचणीत सापडले आहेत. शासनाने तातडीने यावर तोडगा काढून कृषी सेवा केंद्रांचे कामकाज पूर्ववत करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



