ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोखंडी पोल व अल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

पिकअप वाहनासह अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त ; धाबा पोलिसांची यशस्वी कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

धाबा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोमनपल्ली ते धाबा रोडवर वीज वितरण कंपनीचे लोखंडी पोल व अल्युमिनियम तारा चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पीक अप वाहनासह एकूण १० लाख ८४ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ ते २६ एप्रिल २०२६ च्या दरम्यान मौजा सोमनपल्ली परिसरातील विद्युत डी पी पोल क्रमांक १०४ हा अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने कापून चोरण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी धाबा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(१), ६२ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. २६ एप्रिल च्या रात्री १२.३० च्या सुमारास पोलीस पथक गस्तीवर असताना, त्यांना सोमनपल्ली _ धाबा रोडवर धर्मराव भोयर यांच्या शेताजवळ एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिक अप वाहन ( एम.एच.३४_ सी.क्यू. २५०२) संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता, केबिनमध्ये मोठे वायर कटर, कापडी हॅण्डग्लोज, बॅटरी आणि इतर साहित्य मिळून आले. तसेच वाहनाच्या मागील भागात जाड दोरखंड आढळून आला. परिसरामध्ये, घटनास्थळापासून ७५ मीटर अंतरावर एका डी पी जवळ लाल रंगाचा एच. पी. गॅस सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर, गॅस कटर, नोझल, पाना आणि हातोडी असे चोरीसाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य मिळून आले. चोरट्यांनी डी.पी. पोल जमिनीपासून एक फूट उंचीवरून गॅस कटरने पूर्णपणे कापला होता.

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चंद्रपूर येथील भंगार व्यावसायिक मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब ( वय ४९ ) आणि जमील करीम शेख ( वय ३९ ) यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे बोलेरो पिक अप वाहन, गॅस सिलेंडर, कटर, मोबाईल संच, लोखंडी पोलचे ३२ तुकडे आणि अल्युमिनियम तारा असा एकूण १० लाख ८४ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन धाबाचे प्रभारी ठाणेदार सपोनी सुबोध वंजारी, पोलीस हवालदार विजय मडावी, अमित गुरनूले, मासूम मेश्राम, धनराज सयाम, रामेश्वर पाल, गजानन तुरेकर आणि अमोल कुळमेथे यांनी पार पडली. या कारवाईमुळे परिसरात चोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये